२२ फेब्रुवारी २०२५ अकोले : मावस दिराने दारूच्या नशेत भावजयीचा खून केला.ही घटना गुरुवारी (दि.२०) रात्री दहाच्या नंतर उंचखडक बुद्रुक शिवारात घडली.शुक्रवारी पहाटे खून झाल्याचे उघड होताच अकोले पोलिसांनी आरोपी राजू शंकर कातोरे (वय ५४) यास ताब्यात घेतले.जिजाबाई शिवराम खोडके (वय ४५) असे मयत महिलेचे नाव आहे.
उंचखडक बुद्रूक शिवारात भाऊसाहेब आनंदा देशमुख यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये त्यांच्या शेतात काम करणारे मजूर राजू शंकर कातोरे, त्याची मावस भावजय जिजाबाई शिवराम खोडके व जिजाबाई हिचा २४ वर्ष वयाचा मुलगा फिर्यादी सुनील शिवराम खोडके मूळ गाव बोराचीवाडी गर्दणी हे एकत्र राहत.

राजू यास दारूचे व्यसन आहे. गुरुवारी जिजाबाई व राजू हे आठवडे बाजाराला अकोलेस गेले होते. मुलगा सुनील गर्दणीला गेला होता. बाजाराहून आल्यानंतर गुरुवारी रात्री जिजाबाई व राजू दोघेच घरी होते.दोघांमध्ये जोराचे भांडण झाले.भाऊसाहेब देशमुख यांचा मुलगा संजय याने भांडण सोडवले व तो घरी निघून गेला.
जिजाबाई हिचा खून झाल्याची बाब पहाटे लक्षात आली. राजू याने दारूच्या नशेत लोखंडी उलथनी, लोखंडी रॉड याच्या साह्याने मारहाण केल्याने जिजाबाई हिचा खून झाल्याचे लक्षात येताच पोलिसांनी राजू यास अटक केली.मयतचा मुलगा सुनील याच्या फिर्यादीवरून राजू कातोरे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
पूर्वीही केला महिलेचा खून
आरोपी राजू शंकर कातोरे याच्यावर पूर्वी एका महिलेचा खून केल्याचा गुन्हा असून, चार-पाच वर्षापूर्वी तो शिक्षा भोगून आल्याचे समजते.