अहिल्यानगर : शहराजवळ असलेल्या भिंगारमध्ये घरफोड्या करणाऱ्या तिघा भामट्यांना भिंगार कॅम्प पोलिसांनी संगमनेरमध्ये अटक केली आहे. त्यांनी नगर पाथर्डी रोडवरील वडारवाडी येथील मेडिकल दुकान फोडले होते. त्यांना संगमनेर येथील बसस्थानक परिसरात शिताफीने पकडले आहे. त्यांनी भिंगार परिसरात ५ ठिकाणी घरफोड्या केल्याचे उघडकीस आले असून त्यांच्याकडून रोख रक्कम व किराणा माल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की भिंगार येथील नगर पाथर्डी रोडवरील वडारवाडी येथे न्यू सिटी पॉइंट नावाचे मेडिकल दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरट्याने ड्रॉवरमध्ये ठेवलेली रक्कम चोरून नेल्याची घटना २९ डिसेंबर २०२४ रोजी रात्री घडली होती. याप्रकरणी वसीम सुलेमान खान (रा. भिंगार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या शिवाय याच कालावधीत भिंगार परिसरात अनेक चोऱ्या, घरफोड्या झाल्या होत्या. त्यामुळे पोलिसांकडून या आरोपींचा कसून तपास केला जात होता.
गुन्ह्याचा तपास करीत असताना या गुन्ह्यातील आरोपी हे आष्टी तालुक्यातील दौलावडगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली. भिंगार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला असता पोलिसांची चाहूल लागताच आरोपी तेथून पसार झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला असता ते आरोपी संगमनेर बसस्थानक येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संगमनेर बसस्थानकावर सापळा रचून तिघांना पकडले.त्यामध्ये अकबर लुकमान खान (रा. दौलावडगाव, ता.आष्टी, जि. बीड), अयान रईस शेख (रा. कोठी, स्टेशन रोड अ.नगर) व एक विधीसंघर्षित बालक यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीचे पाच गुन्हे केले असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील रोख रक्कम व किराणा माल असा मुद्देमाल हस्तगत केला.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे पोलीस अंमलदार दीपक शिंदे, रवी टकले, नंदकुमार पठारे, संदीप घोडके, प्रमोद महाले, दक्षिण मोबाईल सेलचे पोलिस अंमलदार राहुल गुंडू नितीन शिंदे यांनी केले.
