Business Idea:- आर्थिक परिस्थिती कशीही राहिली तरीपण जर मनामध्ये एखादी गोष्ट पूर्ण करण्याची जिद्द असेल व त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न करण्याची धमक व्यक्तीमध्ये असेल तर कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होणे अवघड नाही. परंतु त्याकरता मात्र सगळ्यात अगोदर तुमच्या मनामध्ये इच्छाशक्ती जागृत होणे खूप गरजेचे असते. मनामध्ये एखादी इच्छा झाली व ती पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न केले तर मात्र यश मिळते.
आजकालची तरुणाई बघितली तर उच्च शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळेल या अपेक्षेने वणवण भटकतात व तरी देखील चांगली नोकरी मिळेल याची कुठल्याही प्रकारची शाश्वती नसते. त्याऐवजी जर एखादा चांगला व्यवसाय जर उभारला तर त्या माध्यमातून आर्थिक समृद्धी मिळू शकते व आयुष्याची घडी नेमकेपणाने बसवता येणे शक्य होते.

परंतु त्याकरिता मात्र तुमच्या मध्ये इच्छाशक्ती जागृत होणे गरजेचे असते. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात असलेल्या पळसगाव येथील प्रदीप भोसले या पदवीधर तरुणाची यशोगाथा बघितली तर ती मनामध्ये असलेली इच्छा व ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न व त्या प्रयत्नांच्या माध्यमातून मिळालेले यश आपल्याला समजून घेता येईल.
दाळ बट्टीसाठी लागणारे पीठ तयार करण्याचा उभारला उद्योग
दाळ बट्टी म्हटले म्हणजे जवळपास संपूर्ण महाराष्ट्र मध्ये एक प्रसिद्ध असा आहार असून ग्रामीण भागापासून तर शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर दाळ बट्टी सर्वांना आवडते. तसेच अनेक कार्यक्रमांमध्ये देखील मेनूमध्ये दाळ बट्टीचा समावेश केला जातो. नेमकी हीच गोष्ट संधी म्हणून ओळखत प्रदीप भोसले यांनी दाळ बट्टी साठी लागणारे तयार पीठ तयार करण्याचा उद्योग उभारला व आज त्या माध्यमातून तब्बल 50 लाख रुपयांची उलाढाल ते करत आहेत.
प्रदीप भोसले यांनी अशा प्रकारे केली उद्योगाला सुरुवात
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात असलेल्या पळसगाव येथील राहणारे प्रदीप भोसले यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर चालवायचा निर्णय घेतला व ते ट्रेनिंग सेंटर सुरू केले. परंतु ग्रामीण भाग असल्यामुळे या व्यवसायाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही व त्यांनी लवकरच हे ट्रेनिंग सेंटर बंद केले.
परंतु आता पुढे काय करायचे? या प्रश्नात असताना त्यांनी कुटुंबाशी चर्चा केली व त्या चर्चेनंतर ठरले की बट्टी पीठ तयार करण्याचा उद्योग उभारावा व त्या दिशेने प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला त्यांच्याकडे भांडवलाची आणि मनुष्यबाळाची कमतरता होती व यासारख्या अनेक अडचणी त्यांच्या समोर आल्या. परंतु या अडचणींवर त्यांनी यशस्वीपणे मात केली व एका मित्रासोबत चर्चा करून पार्टनरशिपमध्ये उद्योग सुरू करण्याचे ठरवले.
सन 2017 मध्ये त्यांनी त्याकरिता 45 बाय 35 फुटाचे शेड उभारले व काही आवश्यक यंत्र खरेदी करून गजराज तयार बट्टी आटा प्रक्रिया उद्योगाची सुरुवात केली. परंतु प्रदीप भोसले व त्यांचे मित्र युवराज भवर यांच्यामध्ये काही कारणास्तव थोड्या समस्या निर्माण झाल्या व त्यांनी भागीदारी संपवली. त्यानंतर मात्र प्रदीप भोसले यांनी एकट्याने हा प्रक्रिया उद्योग चालवायचे ठरवले व आज ते यशस्वीपणे हा उद्योग चालवत आहे.
महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या या तयार बट्टी पिठाची विक्री छत्रपती संभाजी नगरच नाहीतर अहिल्यानगर तसेच जालना व जळगाव या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर होते. प्रदीप यांनी या तयार पिठाची विक्री करता यावी म्हणून काही तरुणांना नोकरीवर ठेवले आहे. इतकेच नाही तर शेतीमालाची प्रक्रिया तसेच पीठ तयार करण्यापासून तर तयार पिठाची पॅकिंग इत्यादी करिता देखील तरुणांच्या हाताला काम मिळाले असून त्यांना रोजगार प्राप्त झाला आहे.
अशा पद्धतीने तयार केले जाते बट्टी पीठ
बट्टी पीठ तयार करण्यासाठी प्रामुख्याने मका, गहू तसेच सोयाबीन, ओवा, बडीशोप इत्यादींची खरेदी बाजार समितीच्या अधिकृत परवानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून केली जाते.
खरेदी केलेल्या या मालाची स्वच्छता केली जाते व गुणवत्तेनुसार वर्गीकरण केले जाते. यामधून उत्तम दर्जाच्या शेतीमालाची निवड करून त्या मालावर प्रक्रिया होते. पीठ तयार करताना सगळ्यात आधी मका भरडला जातो व भरडलेला मका तसेच गहू, सोयाबीन, बडिशोप व ओवा इत्यादी घटक एकत्र करून ते दळले जातात व बारीक पीठ तयार केले जाते. त्यानंतर या पिठात हळद आणि खाण्याचा सोडा मिसळला जातो व एक किलोच्या आकर्षक पॅकिंग मध्ये हे पीठ हवाबंद करून विक्री केले जाते.