Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नगर अर्बन बँक घोटाळा हा संपूर्ण राज्यात गाजलेला घोटाळा आहे. याप्रकरणी अनेकांना अटक देखील झालेली आहे.
आता या प्रकरणी आणखी एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. बहुचर्चित नगर अर्बन बँक घोटाळ्यामधील संशयित आरोपी सीए विजयकुमार मर्दा हा पसार झाला आहे.
तो परदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात ‘लुक आउट’ नोटीस जारी केली आहे.
नगर अर्बन बँकेतील सुमारे २९१ कोटींच्या घोटाळ्याचा तपास येथील आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना अटक केली आहे.
अटक केलेले मुख्य कर्ज तपासणी अधिकारी मनोज वसंतलाल फिरोदिया व कर्जदार प्रवीण सुरेश लहारे सध्या पोलीस कोठडीत आहे. दरम्यान अहमदनगर शहर सहकारी बँक फसवणूक प्रकरणात विजयकुमार मर्दा याला अटक करण्यात आली होती.
त्या गुन्ह्यात त्याला जामीन मिळाला आहे. त्याचा अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणात सहभाग असतानाही त्याला वर्ग करून न घेतल्याचा आक्षेप बँक बचाव समिती व ठेवीदारांच्या वतीने न्यायालयात घेण्यात आला होता.
याबाबत म्हणणे मांडताना सीए मर्दा याच्या शोधासाठी ‘लूक आऊट’ नोटीस काढत असल्याचे तपासी अधिकारी संदीप मिटके यांनी न्यायालयात सांगितले होते.
सीए मर्दाची ‘लूक आउट’ प्रस्ताव ब्युरो ऑफ इमिग्रेशन, गृह मंत्रालय भारत सरकार, दिल्ली येथे पाठवला होता त्याला मंजुरी मिळाल्याने मर्दा विरोधात ‘लूक आउट’ नोटीस जारी करण्यात आली आहे.
नगर अर्बनचा घोटाळ्याने ठेवीदारांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांना सध्या गरज असून व स्वतःचे पैसे असूनही हाल सुरु आहेत.
ठेवीदारांच्या विविध आंदोलनानंतर या प्रकरणी तपासाला वेग आला. आता याप्रकणी जवळपास १० लोकांना अटक केली असून अजूनही काही ‘बडे’ लोक अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.