अहिल्यानगर, दि.२०- जिल्ह्यातील जलस्रोतांच्या पुनरूज्जीवनासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार तसेच जलयुक्त शिवार २.० या योजना जिल्ह्यात मोहिम स्तरावर राबविण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना व जलयुक्त शिवार योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी पी.बी. गायसमुद्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, सहायक वनसंरक्षक अश्विनी दिघे, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी शिवम डापकर, भारतीय जैन संघटनेचे प्रतिनिधी नरेश सुराणा आनंद भंडारी, आदेश चंगेडीया, टाटा मोटर्सचे संग्राम खलाटे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, पडणाऱ्या प्रत्येक पावसाचा थेंब न् थेंब जमिनीत जिरवण्यासाठी तसेच अडविण्यासाठी गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार तसेच जलयुक्त शिवार २.० या योजनांची कामे अतिशय नियोजनबद्धरितीने करण्यात यावीत. ५ एप्रिलपर्यंत गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्याचे काम पूर्ण करावे. योजनेंतर्गत ३०० बंधाऱ्यांचे खोलीकरण व रुंदीकरणाची कामे यशस्वीरित्या पूर्ण करावी. योजनेबाबत गावागावात व्यापक स्वरुपात जागृती करण्यात यावी. तसेच विविध अशासकीय सेवाभावी संस्थांना या कामी आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यातील ३६८ गावांची निवड करण्यात आली आहे. योजनेंतर्गत या गावात करण्यात येणाऱ्या कामांना १०० टक्के प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही संबंधित यंत्रणांनी करावी. झालेल्या कामांच्या तुलनेत निधीचे वितरण होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.