‘साईबाबांच्या शिर्डी’वर आता सीसीटीव्हीची नजर; वाढत्या गुन्हेगारीला बसणार लगाम..!

Pragati
Published:

Ahmednagar news : शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे देवस्थान आहे. देशभरातुन साईभक्त मोठ्या प्रमाणावर येथे येत असल्याने शिर्डी शहरात नेहमीच मोठी गर्दी असते.
याच प्रमाणात अनेकदा साईभक्तांची लूट केल्याचे प्रकार घडतात. तसेच शहरात देखील वाढत्या गुन्हेगारीचा आलेख लक्षात घेता पोलिसांकडून शहरात उच्च क्षमता असलेले सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ८० कॅमेरे बसविण्यत आले असून अजून अनेक कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी दिली आहे.

याबाबत कुंभार यांनी सांगितले, की वाढत्या गुन्हेगारीला लगाम बसवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्ह्यात प्रयत्न सुरू आहेत. त्या अनुषंगाने शिर्डी शहरातदेखील गुन्हेगारी रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी शिरिष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत.

वाहनचोरी, धुमस्टाईल चोरी, घरफोडी, बेशिस्त वाहतुक असे प्रकार रोखण्यासाठी शिर्डी शहरात आत व बाहेर येणारे- जाणारे रस्ते, उपनगर चौक, महत्त्वाची ठिकाणे येथे युद्ध पातळीवर उच्च क्षमता असलेले सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू आहत.

आतापर्यंत ८० कॅमेरे बसवण्यात आले आहेत. आणखी मोठ्या प्रमाणावर कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे दुचाकी व धुमस्टाईल चोरीला आळा बसला आहे. या कॅमेऱ्यांचे कंट्रोलिंग शिर्डी पोलीस स्टेशन नियंत्रण कक्षात राहणार आहे. संशयित गुन्हेगार पकडण्यासाठी शिर्डी पोलिसांना याचा मोठा फायदा होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

शिर्डी शहरात सुरक्षेसाठी नेहमीच खबरदारी घेतली जाते. बेशिस्त वाहनचालक, रस्त्यावर कुठेही वाहने उभी करणारे, ट्रिपल सिट दुचाकी चालविणारे, टवाळखोर, रस्त्यांवर वाढदिवस साजरे करणारे यांच्यावरदेखील सीसीटीव्हीची नजर राहणार आहे.

यातील काही कॅमेरे सुरूदेखील झाले आहेत. उर्वरीत कॅमेरे लगतच्या काळात सुरू होणार आहेत. त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. उंच पोल उभे करून चारही बाजूंनी येणारे जाणारे वाहने दुचाकी चालक नागरिक देखील यात स्पष्टपणे दिसणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe