Ahmednagar News : अखेर ज्याची वर्षानुवर्षे सर्व भारतीय वाट पाहत होते ती वेळ आता आली आहे. समस्त भारतीयांच्या मनातील प्रभू श्रीरामांची अयोध्येत २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होतेय. हा समारंभ म्हणजे प्रत्येक भारतीयांच्या इच्छापूर्तीचा क्षण असणार आहे.
हा सोहळा सर्वच ठिकाणी साजरा व्हावा, गोरगरिबांना दिवाळी साजरी करता यावी यासाठी अहमदनगर जिल्ह्यात भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी जबरदस्त नियोजन केलेलं आहे. त्यांनी नगरच्या दक्षिण जिल्ह्यातील ९०८ गावांमधील ५ लाख १९ हजार शिधापत्रिकाधारकांना मोफत चार किलो साखर व एक किलो हरभरा डाळ वितरित केली आहे.

व या साखर व हरभऱ्याच्या डाळीपासून १ कोटी ८१ लाख ६५ हजार लाडू तयार केले जाणार असल्याने २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी प्रत्येक घरांत छोटी दिवाळीच साजरी होईल असे डॉ.सुजय विखे यांचे धोरण आहे.
‘इतकी’ साखर व डाळ वाटप
खासदार डॉ. सुजय विखे यांनी दक्षिणेतील गावागावांत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शिधापत्रिकाधारकांना चार किलो साखर व एक किलो हरभरा डाळीचे वाटप सुरू केलेलं असून आतापर्यंत १५० गावांमधील १० हजार शिधापत्रिकाधारकांना साखर व डाळ मोफत वितरित करून झाली आहे. २० जानेवारीपर्यंत नगर जिल्ह्यातील गावांमध्ये याचे वाटप होईल.
असा तयार होईल प्रसाद
२० टन ७६० किलो साखर व ५ टन १९० किलो हरभऱ्याच्या डाळी पासून १ कोटी ८१ लाख ६५ हजार लाडू तयार होईल असे नियोजन आहे. या लाडवांचा पहिला नैवेद्य हा २२ जानेवारीला प्रत्येक गावातील श्रीराम मंदिरात दाखवला जाईल.
प्रत्येक घरात तयार झालेल्या लाडूपैकी दोन लाडू प्रत्येकांकडून घेऊन त्याचा एकच ५०० किलोचा लाडू बनवून त्या लाडूचा प्रसाद भाविकांना वाटला जाईल. त्यातील जे लाडू उरतील ते जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना वाटले जातील.
लोकसभेसाठी साखरपेरणी ?
अयोध्येतील सोहळ्यानिमित्त भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीची साखर पेरणी केली जात असल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभेसाठी अहमदनगर मध्ये खा. सुजय विखे हाच भाजपचा चेहरा असतील.
त्यामुळे त्या अनुशंघाने ही साखर पेरणी सुरु आहे जेणे करून तळागाळापर्यंत पोहोचता येईल. लोकसभेच्या दृष्टीने हे पाऊल असल्याची चर्चा आहे.