Onion Export : केंद्र सरकारने अचानकपणे कांद्याची निर्यातबंदी जाहीर केल्यामुळे कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडले. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, तरी शेतकऱ्यांच्या या नुकसानीचा विचार करून केंद्र सरकारने ताबडतोब कांद्याची निर्यात बंदी मागे घ्यावी, अन्यथा शेतकऱ्याला रस्त्यावर यावे लागेल.
असा इशारा अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिला. अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित केलेल्या हल्लाबोल आंदोलनावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी ते पुढे म्हणाले सरकारने शेतकऱ्यांवर अत्यंत अन्याय सुरू केला आहे. कांद्याची निर्यात बंद केल्यामुळे कांद्याचे भाव कोसळले आहेत. तर इथेनॉल निर्मितीला बंदी केल्यामुळे उसाचे भाव जे चांगले मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती,
ते उद्याच्या काळात चांगले भाव मिळणार तर नाहीत परंतु साखर उद्योग देखील संकटात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे शासनाने दुधाला ३४ रुपये भाव जाहीर केला असताना आज शेतकऱ्याला २४ रुपये भाव मिळत आहे.
तर दुसरीकडे पशुखाद्याचे प्रचंड दर वाढले आहेत. परिणामी दूध धंदा हा शेतकऱ्याला परवडत नाही व शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होत आहे. पीक विम्याचा आग्रीम हप्ता शेतकऱ्याला अद्याप पोहोचला नाही तरी सध्याच्या परिस्थितीत सर्व शेतकऱ्यांना विमा मिळावा, अशी आग्रही मागणी नागवडे यांनी केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात मागील पंधरवड्यात झालेल्या प्रचंड गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे होऊ नये आज अखेर शेतकऱ्याला कोणत्याही पद्धतीची मदत मिळाली नाही, तरी या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब मदत देण्यात यावी,
अशी आग्रही मागणी जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी केली, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर याप्रसंगी अंकुश कानडे, किरण पाटील, अण्णासाहेब पठारे, मंगल भुजबळ, अरुण मस्के, बाळासाहेब आढाव, संभाजी रोहकले, भरत भवार, शहाजीराजे भोसले, नाशिक शेख समीर काझी प्रकाश शेलार इत्यादी पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.
या हल्लाबोल आंदोलनानंतर जिल्हाधिकारी सालीमठ यांना काँग्रेस पक्षाच्यावतीने निवेदन देण्यात आले व कांद्याची निर्यात बंदी तातडीने उठवावी याबाबत आग्रही मागणी शासनाकडे पाठवण्याबाबत विनंती करण्यात आली.
याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाचपुते, सुभाष शिंदे, प्रदेश युवक काँग्रेस सचिव राहुल उगले, नासिर शेख, समीर काझी, प्रकाश शेलार, मढेवडगांवचे सरपंच प्रमोद शिवे, उपसरपंच राहुल साळवे,
माजी युवक काँग्रेस शहराध्यक्ष मयूर पाटोळे, इंटक शहराध्यक्ष गणेश भोसले, आदेश सरोदे, शामराव वाघस्कर, रिजवान शेख, दत्ता पाठक आदीसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.