Ahmednagar News : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सतरा दिवस उपोषण केले होते, यावेळी सरकारने तीस दिवसांची मुदत मागितली होती. जरांगे पाटील यांनी चाळीस दिवसांची मुदत दिली.
ही चाळीस दिवसांची मुदत बुधवारी (दि. २४) संपत असल्याने आरक्षण न मिळाल्यास जरांगे पाटील पुन्हा उपोषण करणार आहेत. याच उपोषणाला पाठिंबा म्हणून जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारपासून (दि. २५) साखळी उपोषणाचे नियोजन करण्यात आले आहे.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी (जि. जालना) या ठिकाणी सभा घेवून कोटयावधी मराठा समाजाच्या साक्षीने शासनास २४ ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे व मराठा समाजाला ओबीसीमधुन आरक्षण द्यावे अशी विनंती केली होती.
आज ही मुदत संपत असून जर मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केला नाही तर २५ ऑक्टोबरपासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत.
त्यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून राज्यात प्रत्येक तालुक्यात साखळी उपोषण केले जाणार आहे आणि त्याप्रमाणे नियोजन म्हणून जामखेड तालुक्यातील सर्व गावे जामखेड तहसील कार्यालयासमोर दररोज एक गाव याप्रमाणे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत साखळी उपोषण करणार आहेत.
हे उपोषण शांततेच्या मार्गाने व कसलाही हिंसात्मक प्रकार न करता तहसील कार्यालयाची परवानगी घेऊन होणार आहे. यासाठी बुधवारी जामखेड शहर, गुरुवारी लेहनेवाडी, शुक्रवारी जांबवाडी, शनिवारी सावरगाव, रविवारी भुतवडा याप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत तालुक्यातील गावे नियोजनाप्रमाणे दररोज येऊन जामखेड तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण करणार आहेत.
तरी वरील दिलेल्या नियोजनाप्रमाणे जामखेड शहर व दिलेल्या गावातील मराठा बांधव दररोज तहसील कार्यालय या ठिकाणी साखळी उपोषणासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे.
तसेच कोणीही सदर कालावधीमध्ये हिंसात्मक प्रकार करू नये, साखळी उपोषण शांततेच्या मार्गाने करावे व कोणत्याही मराठा बांधवांनी आरक्षणासाठी आत्महत्या करू नयेत असेही आवाहन मराठा क्रांती मोर्चा जामखेडच्या वतीने करण्यात आले आहे.