अहिल्यानगर : मागील काही महिन्यापासुन शिर्डी, संगमनेर, अहिल्यानगर व श्रीरामपूर येथे वेगवेगळया ठिकाणी महिलांचे गळयातील सोन्याचे दागीने चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. या टोळीकडून ११ लाख ८४ हजारांचे १५ तोळे सोने ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शिर्डी येथे दि.२० मार्च रोजी श्रीमती कुमारीदुर्गा रामप्रभु (रा.कपीलेश्वर नगर, निलंग्रे, चेन्नई, तामीळनाडू) या रस्त्याने पायी जात असताना मोटारसायकलवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळयातील सोन्याची चैन ओढून घेऊन गेले होते.याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोसई.अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, बाळासाहेब गुंजाळ, भगवान थोरात, सुनिल मालणकर, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व अरूण मोरे यांचे पथक तयार करून त्यांना याबाबत सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार पथक दि.२९ मार्च रोजी शिर्डीत तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना पथकास सदरचा चैन स्नॅचिंगचा गुन्हा रेकॉर्डवरील सोमनाथ मधुकर चौभे व त्याच्या साथीदारांनी केलेला असून ते शिर्डी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. यावरून पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी शिर्डी परिसरात आरोपीचा शोध घेतला असता सोमनाथ मधुकर चौभ (वय ३९, रा.अशोकनगर, ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर),
अक्षय हिराचंद त्रिभुवन (वय २३, रा.लाडगाव चौफुली, ता.वैजापूर, जि.छ.संभाजीनगर), अनुप उर्फ चिंग्या गोडाजी चव्हाण (वय ३६, रा.माळीसागज, ता.वैजापूर, जि.छ.संभाजीनगर), संतोष म्हसु मगर (वय ३६, रा.बेलापूर रोड, गायकरवस्ती, ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर) या चौघांना ताब्यात घेतले. यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सोमनाथ मधुकर चौभे याने सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली.
ताब्यातील आरोपीकडे त्यांनी आणखी गुन्हे केले आहेत काय याबाबत सखोल विचारपूस केली असता त्यांनी मागील काही महिन्यापासुन शिर्डी, संगमनेर, अहिल्यानगर व श्रीरामपूर येथे वेगवेगळया ठिकाणी महिलांचे गळयातील सोन्याचे दागीने चोरी केल्याचे सांगीतलेल्या माहितीवरून शिर्डी, तोफखाना, संगमनेर शहर व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तब्बल १२ चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे समोर आले.चैन स्नॅचिंगच्या गुन्हयातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता अनुप उर्फ चिंग्या गोडाजी चव्हाण याने चोरी केलेल्या सोन्यापैकी काही सोने हे सोनार महेश अरूणराव उदावंत (रा.गंगापूर, ता.गंगापूर, जि.छ.संभाजीनगर) यास विकले असल्याची माहिती दिली.
पथकाने सोनार उदावंत यांनी घेतलेल्या सोन्याची चैन वितळवून केलेली ५ लाख ५३ हजार ८४० रूपयांची सोन्याची लगड जप्त केली. सोमनाथ मधुकर चौभे याने गुन्हयातील चोरी केलेल्या सोन्यापैकी काही दागीने हे सोनार गुणवंत चंद्रकांत दाभाडे (रा.कोळपेवाडी, ता.कोपरगाव, जि.अहिल्यानगर) व काही दागीने हे सोनार विजय अशोक दाभाडे (रा.महालगाव, ता.वैजापूर, जि.छ.संभाजीनगर) यास विकले असल्याची माहिती सांगून गुन्हयातील काही चोरी केलेले
सोन्याचे दागीने हे त्याचे सासरी (कोळपेवाडी ता.कोपरगाव) येथे ठेवल्याची माहिती सांगीतली. पथकाने ५ लाख ५० हजार ४८० रूपयांचे सोन्याचे दागीने व गुन्हयांत वापरलेली ८० हजारांची मोटारसायकल जप्त केली. यातील सोमनाथ मधुकर चौभे हा पसार आहे.एकूण १२ चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणुन एकुण ११ लाख ४ हजार ३२० रूपयांचे दागिने व ८० हजारांची मोटारसायकल असा एकूण ११ लाख ८४ हजार ३२० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.