चक्क सरपंच पतीचाच गावातील रस्त्याला विरोध, काम बंद पाडत समाजसेवकाला केली मारहाण

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, , 02 फेब्रुवारी 2022 :-  गावात सुरू असलेले रस्त्याचे काम सरपंच पतीनेच बंद पाडले. त्यांना समजून सांगण्यासाठी गेलेल्या गावातील समाजसेवकालाही मारहाण केली. मांंजरसुंबा (ता. नगर) गावात ही घटना घडली.

डॉ. रामनाथ गोविंद कदम (वय 36 रा. मांजरसुंबा) हे मारहाणीत जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून

त्यांनी उपचारादरम्यान एमआयडीसी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून सरपंच पती भाऊसाहेब रावसाहेब कदम, ग्रामपंचायत सदस्य किरण शिवाजी कदम व देविदास ऊर्फ पप्पु नारायण कदम (सर्व रा. मांजरसुंबा) यांच्याविरूध्द भादंवि कलम 326, 324, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी डॉ. कदम यांना लोखंडी गज, कुर्‍हाडीचा दांडा, लाकडी काठीने मारहाण केली. त्यात त्यांच्या पायाला मार लागला आहे. जिल्हा परिषद निधीमधून मांंजरसुंबा गावात रस्त्याचे काम सुरू असताना

ते काम सरपंच पती भाऊसाहेब कदम, ग्रामपंचायत सदस्य किरण कदम व देविदास ऊर्फ पप्पु कदम यांनी बंद पाडले होते. याबाबतची माहिती ग्रामपंचायत सदस्य देविदास विठ्ठल कदम यांनी डॉ. रामनाथ कदम यांना दिली.

डॉ. कदम लगेच रस्ता काम सुरू असलेल्या ठिकाणी गेले. त्यावेळी सरपंच पती भाऊसाहेब कदम, पप्पु ऊर्फ देविदास कदम यांनी डॉ. कदम यांना लोखंडी गज व कुर्‍हाडीच्या दांड्याने मारहाण करून जखमी केले.

डॉ. कदम यांच्या पायाला मार लागला आहे. हे भांडण सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या देविदास विठ्ठल कदम यांना किरण कदम याने लाकडी काठीने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe