गावगाडा चालवणारे तुम्ही आमचे दहा टक्के लोक पुढे चालले तर तुम्हाला बघवत नाही, राज्याच्या सभागृहामध्ये आमचे प्रतिनिधीत्व कुठे आहे, नालायकांना बाजुला सारून आम्ही आता लायक माणसं विधानसभेत पाठवू, दंगलीची परंपरा कोणाची आहे, मराठावाडा नामांतराच्या वेळी कोणी दंगली घडविल्या, असा प्रश्न लक्ष्मण हाके यांनी विचारला.
तसेच, मुख्यमंत्र्यांना सांगा की लाडकी बहीण आणली, लाडका भाऊ आणला, आता लाडका आंदोलक म्हणून योजना आणा, असा उपरोधिक टोला देखील प्रा. लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांना मारला.
संत भगवान गडावर आल्यानंतर संत भगवान बाबा, संत भिमसिंह महाराज यांच्या समाधीचे दर्शन हाके यांनी घेतले. त्यानंतर गडाचे महंत डॉ नामदेवशाखी सानप महाराजांचा शुभाशिर्वाद घेतला. शाखी महाराजांनी हाके यांना श्रीफळ देऊन गौरव केला.
त्यानंतर स्थानिक पत्रकारांशी बोलताना हाके म्हणाले, आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, ही मागणीच बेकायेदशीर आहे. जरांगे यांनी आरक्षण संपविण्याची तयारी केली असेच दिसते. आरक्षण उद्ध्वस्त करण्याची खेळी सुरू आहे. निवडून गेलेली लोके आमची नाहीत. आमचे प्रतिनिधीत्व तयार करावे लागेल.
पैसा मिळवयाचा व त्यातून सत्ता मिळावायची अशी, प्रवृत्ती सुरू आहे. आरक्षणासाठी आमचा लढा सुरूच राहील, मी कोणासोबतही चर्चा करायला तयार आहे, आम्ही कोणाचे आरक्षण खाल्लेले नाही. कायदा तयार करणारे तुमचेच लोक आहेत. अंमलबाजावणी करणारे तुमचेच लोक आहेत. सत्ता तुमच्याच लोकांच्या हातात आहे. मुख्यमंत्र्यांनी आता लाडका आंदोलक, अशी योजना सुरू करावी, असा टोला हाके यांनी लगावला.
ओबीसी सर्व एकच पर्व… अमर रहे… अमर रहे..
स्व. गोपीनाथ मुंढे अमर रहे.. संत भगवान बाबा की जय, अशी घोषणाबाजी या वेळी करण्यात आली. ओबीसी समाज आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक झाल्याचे चित्र या वेळी दिसले. ओबीसींच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी एकजूट करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. लक्ष्मण हाके यांचे पाथर्डी येथे जोरदार स्वागत करण्यात आले. ओबीसी कार्यकर्त्यांनी त्यांचा गौरव केला. हाके यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.