बालकामगाराच्या मृत्यूची फाईल बंद ! आता मुलगा तर गेला, मग लढायचे कोणासाठी …

Published on -

Ahmednagar News : अखेर गणेश जाधव, या बालकामगाराच्या मृत्युप्रकरणी नातेवाईकांनी आमची काही तक्रार नाही, असा जबाब दिला आहे. गणेश वयाच्या आठ वर्षांपासून मेंढ्या सांभाळायचा, त्याच्या आयुष्याची जशी ससे होलपट झाली, तशीच ससेहोलपट त्याच्या मृत्यूच्या चौकशीची झाली.

गणेश जाधव हा मूळचा कोकणातील मानगाव तालुक्यातील रहिवाशी होता. त्याचे आई- वडील पुणे येथे वाकड नदीच्या काठी कोळसा पाडायचे काम करण्यासाठी आले होते. तेथूनन ते पाथर्डीच्या आंबेवाडी येथे एका कोळसा व्यापाऱ्याकडे कामाला आले.

गणेशही त्यांच्या सोबत आला. पुढे आई मृत्यू पावली. एक-दीड वर्षापूर्वी वडीलही देवाघरी गेले. गणेश सात ते आठ वर्षापासून निवडुंगा येथील एका मेंढ्या पाळणाऱ्या शेतकऱ्याकडे बालमजुरी करीत होता.

मेंढ्या सांभाळताना कासारपिंपळगाव येथे दि. १ डिसेंबर २०२३ रोजी गणेशने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर गणेश जाधवचा मृतदेह पोलिसांच्या परस्पर पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणला गेला.

गणेशने आत्महत्या का केली, याची चौकशी झालीच नाही गणेश जाधवचे नातेवाईक कोण आहेत, याचा तपास सुरु झाला. मृत्युनंतर तिसऱ्या दिवशी गणेशचा भाऊ व काही नातेवाईकांना येथील एका कोळसा व्यापाऱ्याने बोलावून घेतले.

पोलिसांनी कोळसा व्यापाऱ्यास पोलिस ठाण्यात बोलावून त्याची चौकशी केली, त्याला चार तास बसून ठेवल्यानंतर त्याची सुटका झाली. चौथ्या दिवशी गणेशच्या नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह दिला गेला, त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले.

कोकणातील बालकामगारांच्या प्रश्नांवर काम करणारे सोपान सुतार आले होते. ते आदिवासी पाड्यातील कामगारांच्या संघटनेचे नेते आहेत. त्यांनी पोलिस अधिकारी व गणेश जाधवच्या नातेवाईकांशी चर्चा केली.

गुन्हा दाखल करावा, असे सांगितले. मात्र, आता मुलगा तर गेला, मग लढायचे कोणासाठी, असा प्रश्न उपस्थित करून काही लोकांनी मध्यस्थी करत हे प्रकरण आमची कोणतीही तक्रार नाही, असे सांगून मिटविण्यात आले आहे.

बालमजुरी करणे, मानवी तस्करी करून त्याची वाहतूक करणे, त्यामधून पैसे कमावणे, असे उद्योग तालुक्यात अनेक ठिकाणी सुरू असताना त्याला कोणाचाही पायबंद नाही. बालहक्क आयोग, बालमकागार कायद्याची अंमलबाजणी करणारी शासकीय यंत्रणा, यांनी कोणतीही दखल का घेतली नाही.

वृत्तपत्रांतून याबाबत सर्व माहिती प्रसिद्ध झाली. तरीही कोणीही गणेश जाधवच्या मृत्यूची दखल का घेतली नाही? जिल्हा प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्याने पाच दिवसात साधी विचारणादेखील केली नाही. यामागे नेमके कोण आहे

आदिवासी मुलांची विक्री केली जाते !

गणेश जाधव हा बालमजुरी करणारा बालकामगार होता. तो ज्यांच्याकडे होता त्यांना राजकीय आश्रय आहे. पाथर्डी तालुक्यात कोणकणातून बालकामगार आणून त्याची विक्री करणारी टोळी कार्यरत आहे.

आदिवासी मुलांची विक्री केली जाते. त्यांचा छळ केला जातो. गणेश जाधव याची आत्महत्या आहे, की हत्या, याची चौकशी करण्याची मागणी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला व जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्याकडे लेखी निवेदन देऊन मी केली आहे

बालमजुरी व मानवी तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला पाहिजे आम्ही आंदोलन करणार आहोत असे प्रा. किसन चव्हाण, राज्य उपाध्यक्ष किसन वंचित बहुजन आघाडी यांनी बोलताना सांगितले.

मानवी तस्करी करून बालकामगार कायद्याचे

गणेश जाधव याला मेंढपाळाकडे कोणी आणून घातले. बालकामगाराकडून काम करून घेणे गुन्हा असताना त्याला कामावर कोणी ठेवले, त्याने आत्महत्या का केली, याचा तपास झाला नाही व तक्रार नाही म्हणून आम्ही करणारही नाही, असे सांगून पोलिसांनी हा प्रश्न आमच्यासाठी संपला असल्याचे सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe