कोपरगाव शहरातील मोहनीराज नगर भागात मंगळवारी सकाळी इमारतीच्या बांधकामासाठी खाेदलेल्या खड्डयात पडलेल्या चार वर्षीय चिमुकलीला वाचवण्यात प्रशासनाला यश आले. दिड ते दोन तास शर्थीचे प्रयत्न करून चिमुकलीला बाहेर काढण्यात आले.
प्रथमोपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती स्थिर आहे. ईश्वरी संतोष गंगावणे असे या मुलीचे नाव आहे. ईश्वरी ही चार वर्षीय चिमुकली मंगळवारी ९ नोव्हेंबरला सकाळी काम सुरू असलेल्या इमारतीजवळ खेळत होती.

खेळता खेळता ती इमारतीसाठी खोदलेल्या १५ फूट खोल खड्डयात पडली. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रशासनाला कळवले.
नगरपालिकेचे अग्निशमन दल त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी जेसीबी मशीन बोलावून ईश्वरी पडलेल्या खड्ड्याच्या समांतर खड्डा खोदून त्याला बोगदा पाडून चिमुरड्या
ईश्वरीला स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुखरुप बाहेर काढले. तिला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.













