चोंडी-गिरवली-कवडगाव-अरणगाव या १२ किलोमीटर रस्त्यासाठी केंद्रीय मार्ग निधीतून १० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. सदर निधी मंजूर झाल्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेले चोंडी गाव आता राष्ट्रीय महामार्गाशी जोडले जाणार आहे अशी माहिती सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिली.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चोंडी गावाचा देशातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा यासाठी विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी कंबर कसली आहे.
श्री क्षेत्र चोंडी हे गाव राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी ला जोडले जावे यासाठी सभापती शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे महिनाभरापूर्वी मागणी केली होती. त्यानुसार नितीन गडकरी यांनी शिंदे यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत चोंडी-गिरवली-कवडगाव-अरणगाव या १२ किलोमीटर रस्त्यासाठी केंद्रीय मार्ग निधीतून १० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. सदर निधी मंजूर झाल्यामुळे चोंडी गाव आता राष्ट्रीय महामार्गाशी जोडले जाणार आहे. पर्यटकांसाठी चोंडीत पोहचणे सहज शक्य होणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांचे जीवन आणि त्यांच्या कार्याचे सर्व पैलू देशवासियांना एकाच ठिकाणी पाहता व अनुभवता यावेत यासाठी श्री क्षेत्र चोंडी विकासाचा सर्वसमावेशक असा बृहत विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. चोंडी हे देशातील प्रमुख पर्यटनस्थळ व्हावे, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. चोंडीला जोडणारे सर्व रस्ते पक्के केले जात आहे अशी माहिती शिंदे यांनी दिली.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेले श्री क्षेत्र चोंडी हे गाव देशातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी माझा पाठपुरावा सुरु आहे. देशभरातील पर्यटक चोंडीला सहजपणे यावेत यासाठी चोंडीला जोडणारे सर्व रस्ते दर्जेदार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार चोंडी ते अरणगाव हा गिरवली मार्गे असणारा प्रमुख रस्ता दर्जेदार व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली होती. त्यांनी १० कोटींचा निधी मंजूर केला असल्याची प्रतिक्रियाही सभापती प्रा. शिंदे यांनी दिली.