अहिल्यानगरमधील ‘त्या’ प्रकरणाचा शोध घेण्यासाठी सीआयडी पथक पारनेरमध्ये तीन दिवसांपासून तळ ठोकून, पोलिसांवर नाराजी

बजरंग दल व शिवसेनेचा कार्यकर्ता दीपक उंडे अडीच वर्षांपासून बेपत्ता असून, तपासात अपयशी ठरलेल्या पोलिसांनंतर प्रकरण सीआयडीकडे वर्ग झाले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार एक महिन्यात अहवाल सादर करावा लागणार आहे.

Published on -

Ahilyanagar News: पारनेर- तालुक्यातील कर्जुले हर्या येथील बजरंग दल आणि शिवसेनेचा युवा कार्यकर्ता दीपक सुदाम उंडे गेल्या अडीच वर्षांपासून बेपत्ता आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप लागलेला नाही. सुरुवातीला पारनेर पोलिस आणि नंतर स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास असताना कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. आता हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आले असून, गेल्या दोन-तीन दिवसांपासून सीआयडीचे तीन अधिकारी पारनेरमध्ये तळ ठोकून तपास करत आहेत.

दीपक उंडे बेपत्ता प्रकरणाला अडीच वर्षे उलटूनही कोणताही सुगावा लागला नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. खंडपीठाने हा तपास सीआयडीकडे सोपवत एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दीपकचे अपहरण झाले, त्याचा खून झाला की अन्य काही कारण आहे, याचा नव्याने तपास करण्याचे निर्देश सीआयडीला देण्यात आले आहेत.

नेमकी घटना काय आहे?

६ डिसेंबर २०२२ रोजी दीपकचे वडील सुदाम उंडे यांनी पारनेर पोलिस ठाण्यात आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि पोलिस निरीक्षक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. तपासादरम्यान पोलिसांनी एका आरोपीला निष्पन्न केल्याचे सांगितले आणि काही आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. मात्र, पोलिसांनी सादर केलेल्या रिमांड अहवालात आणि साक्षीदारांच्या जबाबात दीपक उंडेचा खून झाल्याचा उल्लेख असूनही, आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०२ (खुनाचा गुन्हा) अंतर्गत कारवाई झालेली नाही, असा आरोप सुदाम उंडे यांनी केला आहे.

औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल

सुदाम उंडे यांनी अॅड. एन. बी. नरवडे यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली. याचिकेत त्यांनी तपास यंत्रणेकडून योग्य माहिती मिळत नसल्याचा आणि तपासात ढिसाळपणा होत असल्याचा आरोप केला. दीपकचा मृतदेह सापडलेला नाही किंवा तो बेपत्ता असल्याचेही स्पष्ट झालेले नाही. यामुळे खंडपीठाने पारनेर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासावर नाराजी व्यक्त करत तपास सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश दिले.

स्थानिक पोलिसांवर नाराजी

कर्जुले हर्या येथील हा बेपत्ता युवक आणि त्याच्या प्रकरणातील अनुत्तरीत प्रश्नांनी संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. २०२२ मध्ये पारनेर पोलिसांकडे तपास सोपवण्यात आला, नंतर स्थानिक गुन्हे शाखेकडे हस्तांतरित झाला. मात्र, २०२४ पर्यंत या दोन्ही यंत्रणांना तपासात यश मिळाले नाही. आता सीआयडीने नव्याने तपास हाती घेतला असून, या प्रकरणाचा उलगडा होण्याची कुटुंबीयांना आणि गावकऱ्यांना आशा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News