शेवगाव- तालुक्यातील दिंडेवाडी येथील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हाल होत असून, त्यासाठी त्यांना इतरत्र भटकंती करावी लागत आहे. दिंडेवाडी येथील नागरिकांसाठी आव्हाणे बु. येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीवरून पाणी मिळावे व आव्हाणे बु. ते दिंडेवाडी नवीन पाईपलाईन करून मिळावी, अशा आशयाचे निवेदन जनशक्तीचे कार्याध्यक्ष राम पोटफोडे यांच्या अध्यक्षतेखाली दिंडेवाडी येथील ग्रामस्थांनी शेवगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीम. सोनल शहा यांना दिले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, दिंडेवाडी हे गाव आव्हाणे बु. ग्रामपंचायतला जोडलेले आहे. आव्हाणे येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीवरून यापूर्वी पाईपलाईनद्वारे दिंडेवाडी येथील हौदामध्ये पाणी येत असे. ही पाईपलाईन आता खराब झाली असल्याने गेल्या कित्येक दिवसांपासून या गावाला पिण्याच्या पाणी येणे बंद झाले आहे.

येथील नागरिकांना दररोज विहिरीवरून लांबून पिण्यासाठी व जनावरांसाठी पाणी आणावे लागते. येथील बहुतेक नागरिक हे दुग्ध व्यवसाय व मेंढपाळ असून, त्यांच्याकडे शेळ्या मेंढ्या गुरे-ढोरे मोठ्या प्रमाणात आहेत. आव्हाणे बु ग्रामपंचायतकडे येथील नागरिकांनी अनेकदा यासाठीची मागणी केलेली आहे; परंतु त्यांच्या या प्रश्नाकडे आव्हाणे ग्रामपंचायतकडून सतत दुर्लक्ष होत आहे.
दिंडेवाडी येथील नागरिकांना आव्हाणे बु. येथील पिण्याच्या टाकीवरून नवीन पाईपलाईन करून त्वरित पाणीपुरवठा करावा अन्यथा येथील नागरिक मोठे जनआंदोलन करतील, असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर राम पोटफोडे, बाळासाहेब दिंडे, महादेव रुपनर, प्रल्हाद वाघमोडे, देविदास गडकर, हरिभाऊ दिंडे, बालाजी शिंदे, अशोक आगलावे, गणेश गडकर, काकाजी दिंडे यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.