अहिल्यानगर- गेल्या काही दिवसांपासून शहर आणि उपनगरांमध्ये विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. रोज तीन-चार वेळा वीज गायब होत असल्याने नागरिकांना ऐन उन्हाळ्यात प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सावेडी आणि केडगावसारख्या मोठ्या उपनगरांमध्ये हा प्रकार अधिकच तीव्र झाला आहे. वाढत्या उष्म्यासोबतच विजेची ही अनियमितता नागरिकांच्या संयमाची परीक्षा पाहत आहे.
सावेडीत आणि केडगावात दररोज दोन-तीन वेळा वीज गायब होते. महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हे भारनियमन नाही, तर रोहित्रांच्या क्षमतेपेक्षा जास्त मागणी झाल्याने वीजपुरवठा आपोआप बंद पडतो. पण यामुळे नागरिकांचे हाल थांबत नाहीत. शहराच्या वेगवेगळ्या भागांतून विजेबाबत तक्रारींचा ओघ सुरू आहे. भर दुपारी वीज गेली की उकाड्याने हैराण झालेली माणसे हतबल होऊन बसतात. किरकोळ कामांसाठीही वीज खंडित केली जाते, ज्यामुळे लोकांचा संताप वाढत आहे.

महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या तक्रारींची सत्यता मान्य केली. पण त्यांनी हे स्पष्ट केले की, ही परिस्थिती भारनियमनामुळे नाही. रोहित्रावर जास्त ताण पडल्याने वीजपुरवठा बंद होतो आणि तो पुन्हा सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांना तिथपर्यंत जाऊन दुरुस्ती करावी लागते. या प्रक्रियेत वेळ जातो आणि नागरिकांचा त्रास वाढतो. पण या समस्येवर ठोस उपाय काय, याबाबत त्यांच्याकडे स्पष्ट उत्तर नाही.
नागरिकांचा रोष यावरूनच वाढला आहे. एकीकडे वीज बिल थकलं तर लगेच वीजपुरवठा तोडला जातो. बिलात सगळे कर आणि आकार लावले जातात, पण वीज गेली किंवा त्यात बिघाड झाला तर त्याचा पर्याय देण्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल लोक विचारत आहेत. विजेवर अनेक यंत्रे चालतात, छोटे-मोठे व्यवसाय त्यावर अवलंबून आहेत. पण वीज गेल्यावर ही यंत्रे ठप्प होतात आणि त्याचा थेट फटका दुकानदारांना आणि व्यावसायिकांना बसतो.
याचा परिणाम फक्त घरगुती वापरापुरता मर्यादित नाही, तर शहराच्या पाणीपुरवठ्यावरही याचा विपरीत परिणाम होत आहे. १५ फेब्रुवारी ते १० मार्च २०२५ या २४ दिवसांत पाणीपुरवठा योजनेची वीज तब्बल १२ वेळा खंडित झाली. यामुळे शहरात पाणी वितरणात मोठ्या अडचणी आल्या.
नागरिकांना वीज आणि पाणी या दोन्ही समस्यांना एकाच वेळी तोंड द्यावे लागत आहे. या सगळ्या प्रकारामुळे महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांना या त्रासातून कधी सुटका मिळणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.