सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आश्वासन

Published on -

शिर्डी – राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या योजना सुरूच राहतील आणि कोणतीही जनहिताची योजना बंद केली जाणार नाही, असा स्पष्ट दिलासा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. शेतकरी कर्जमाफीचा विषय महायुतीच्या जाहीरनाम्यात असल्याने त्याची अंमलबजावणी निश्चित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गुढीपाडवा आणि नवसंवत्सरच्या मुहूर्तावर लोणी बुद्रुक येथील श्री मारुती मंदिरात पारंपरिक ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेला मंत्री विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी गावाच्या विकासासाठी नव्या संकल्पांचा निर्धार करण्यात आला. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत मंत्री विखे यांनी आगामी काळातील विकासकामांची माहिती दिली. जिल्ह्यातील पाटपाण्याच्या प्रश्नांवरही जलसंपदा विभागाच्या धोरणांचा आढावा घेतला. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनीही मार्गदर्शन करत विकासाचा रोडमॅप स्पष्ट केला. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना विखे पाटील यांनी महायुती सरकारने सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करून निर्णय घेतले असल्याचे सांगितले.

योजनांची यशस्वी अंमलबजावणी महायुतीचे प्रमुख धोरण असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महायुती सरकारने यापूर्वी एक रुपयात पीक विमा योजना, कापूस व सोयाबीन अनुदान योजना, तसेच ‘लाडकी बहीण’ योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत.

या योजनांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात थेट वर्ग करण्यात आले आहे. मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण’ योजनेचे सर्व हप्ते वेळेवर मिळत असून, कुठलीही योजना बंद पडलेली नाही, असेही विखे यांनी ठामपणे सांगितले. महायुती सरकारच्या योजनांवर टीका करणाऱ्या विरोधकांवर विखे पाटील यांनी कडाडून हल्लाबोल केला. काही ठरावीक लोकांना पोटशूळ उठला आहे,

अशी टिप्पणी करत त्यांनी विरोधी पक्षातील गोंधळाकडे लक्ष वेधले. “जनतेने नाकारलेल्यांचीच अधिक उठाठेव सुरू आहे. विरोधकांना स्वतःच्या पक्षातील नेत्यांचे एकमत साधता येत नाही, त्यामुळे त्यांनी महायुतीच्या कामांवर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचे घर सांभाळावे,” असा टोला विखे पाटील यांनी लगावला. शेतकरी कर्जमाफी महायुतीच्या जाहीरनाम्यात असून, त्याची पूर्तता नक्कीच केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी पुन्हा एकदा दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News