Ahmednagar News : सध्या आषाढी वारीमुळे नगर तालुक्यातील सोलापूर महामार्गावरून जवळपास ६० ते ७० हजार वारकरी पायी दिंडीतून पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिंडीतील वारकरी मुक्कामाला राहत आहेत.आपल्या संस्कृतीनुसार घरी आलेल्या पाहुण्यांना जेवण नाही तर कमीत कमी पिण्यास पाणी तरी देणे आवश्यक असते.
मात्र मागील १५ ते २० दिवसांपासून नगर तालुक्यातील ४२ गावांना पाणी पुरवठा करणारी बुऱ्हाणनगर पाणी पुरवठा योजना बंद आहे. ही योजना बंद असल्याने नागरिकांबरोबरच दिंडीतील वारकऱ्यांनाही ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
बुऱ्हाणनगर पाणी योजना तत्काळ सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदमध्ये शिवसेनेच्यावतीने (उद्धव ठाकरे गट) ठिय्या आंदोलन करण्यात आले.
पुढील काही दिवसावर आषाढी एकादशी आली आहे. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरिला निघाला आहे. त्यामुळे आज जिल्ह्यातील इतर मार्गासह नगर तालुक्यातील सोलापूर महामार्गावरून जवळपास ६० ते ७० हजार वारकरी पायी दिंडीतून पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत.
दरम्यान या मार्गावरील अनेक गावात या दिंडीतील वारकरी मुक्कामाला राहत आहेत. आपल्या संस्कृतीनुसार घरी आलेल्या पाहुण्यांना जेवण नाही तर कमीत कमी पिण्यास पाणी तरी देणे आवश्यक असते. मात्र, बुऱ्हाणनगर पाणी योजना बंद असल्याचा फटका वारकऱ्यांना बसला.
पिण्यास पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांसह वारकऱ्यांची मोठी कुचंबणा झाली. सीना नदी पट्ट्यातील गावामध्ये क्षारयुक्त पाणी आहे. पाणी पिण्यायोग्य नसल्याने परिसरातील नागरिकांसह या वारकऱ्यांचे पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
त्यामुळे या वारकऱ्यांसह नागरिकांची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी तत्काळ ही पाणी योजना कार्यान्वित करावी. अशी मागणी उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदमध्ये ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत पाणी पुरवठा सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशा इशारा संदेश कार्ले यांनी दिला.
आंदोलनात संदेश कार्ले, माजी सभापती रामदास भोर, माजी उपसभापती शरद झोडगे, युवा सेना तालुका प्रमुख प्रवीण गोरे, अमोल तोडमल, बाबा करांडे, राजू गवळी, विलास लोखंडे, प्रशांत वाळके, ऋषिकेश गोरे, आकाश गोरे, भगवान करांडे, जगन्नाथ सांगळे व ग्रामस्थ सहभागी झाले होते .