श्रीगोंदा शहरासह तालुक्यात मागील काही दिवसापासून वाढलेली गुन्हेगारी पोलिसांसह नागरिकांच्या डोक्याला ताप ठरू लागली आहे. गुन्हेगारी कमी करण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने गुन्हेगारांचे धारिष्ठ्य चांगलेच वाढले आहे.
शहरासह तालुक्यात घडणाऱ्या गुन्ह्यात गुन्हेगारांमध्ये खाकीची दहशत कमी झाली असल्याचे चित्र दिसून येत असतानाच सर्वसामान्य नागरिकांच्या मनात मात्र असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.
श्रीगोंदा शहरासह तालुका हा संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. मात्र अलीकडे वाढत असलेली गुन्हेगारी पाहता ही ओळख पुसली जातेय की काय अशी भिती निर्माण होऊ लागली आहे.
कारण तालुक्यासह शहरात दिवसाढवळ्या घरफोड्या, मोबाईल, वाहनचोऱ्या आणि रात्री जबरी चोरीचे गुन्हे घडू लागले आहेत. हाणामाऱ्या तर नित्याच्याच झाल्या असताना मागील काही महिन्यात घडलेल्या खूनांच्या प्रकरणाने श्रीगोंद्यातील गुन्हेगारीचा आलेख शिखरावर नेला आहे.
‘डिटेक्शन इज बेस्ट प्रिव्हेन्शन’ हे गुन्हेगारी रोखण्याचे तत्व आहे. पण, यामध्येच पोलिस कमी पडताना दिसत आहेत. खबऱ्यांचे जाळे कमकुवत झाल्यामुळे गुन्हा घडल्यानंतर त्याची कार्यपद्धती, कोणत्या सराईताने केली असेल याची माहिती तत्काळ पोलिसांना मिळत होती.
पण त्यामध्ये पोलीस कमी पडू लागले असल्याचे बोलले गेल्यास वावगे ठरू नये. उन्हाळ्यात घरफोड्यांचे प्रमाण वाढते ही गोष्ट सर्व अनुभवी पोलिसांना सांगायची गरज नाही.
या वर्षी उन्हाळ्यातील घरफोड्या रोखण्यात पोलिसांना यश येईल की नाही हे येणारा काळच सांगेल. घरफोड्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून त्यासंबंधी नियोजन पोलिसांकडून केले जाणे गरजेचे आहे.