CM Eknath Shinde :- गोदावरी खोऱ्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथे ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल, पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर,
खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार सर्वश्री बबनराव पाचपुते, आ.मोनिका राजळे, आ.किरण लहामटे, आ.प्रा.राम शिंदे, आ.आशुतोष काळे, आ.सत्यजित तांबे, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, जिल्हा परिषद सदस्या शालीनी विखे पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
‘शासन आपल्या दारी’ अभियानात अहमदनगर जिल्ह्यात २४ लाख नागरिकांना योजनांचा लाभ देण्यात येत आहे. यापैकी ३० हजार लाभार्थी आज येथे उपस्थित आहेत. असे नमूद करून मुख्यमंत्री श्री शिदे म्हणाले, आजच्या या शासन आपल्या दारी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. आजपर्यंत शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील १ कोटी ४० लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पना आम्ही थांबविली आहे. नागरिकांना चकरा माराव्या लागू नये यासाठी शासन काम करत आहे. एकाच छताखाली अनेक योजनांचा लाभ मिळत आहे. जिल्ह्यात लाभार्थ्यांना ३ हजार ९८२ कोटींचा लाभ देण्यात आला आहे.
राज्यातील अनेक योजनांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम केंद्र शासनाने केले आहे. राज्याच्या विकासासाठी शासन झोकून देऊन काम करत आहे. आजही राज्यातील निम्म्या साखरेचे उत्पादन अहमदनगर जिल्ह्यातून होत आहे. अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. समृध्दी महामार्गामुळे शिर्डी व परिसराच्या विकासाचे नवे पर्व सुरू होत आहे. असे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री शिंदे पुढे म्हणाले की, राज्यातील सर्व शासकीय रूग्णालयात आता मोफत उपचार मिळत आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत साडेबारा कोटी जनतेला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. ५३ वर्षांपासून रखडलेला निळवंडे प्रकल्प मार्गी लावण्याचे काम शासनाने केले आहे. शासनाने ३५ सिंचन प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता नव्याने दिली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. असे नमूद करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, सध्या राज्यात पावसाने ओढ दिली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास ही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे