जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी घेतला आरोग्य विभागाच्या योजनांचा तपशीलवार आढावा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था बळकटीकरणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी योग्य रितीने करण्यावर भर द्यावा. रुग्णांच्या सोईसाठी आणि त्यांच्यावरील उपचारासाठी आवश्यक असणार्‍या बाबींची पूर्तता करण्यावर भर द्यावा. त्यासाठीचा आरोग्य यंत्रणेने जिल्ह्याचा सर्वंकष आराखडा तयार करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केली.

जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग तसेच इतर आरोग्य यंत्रणांशी संबंधित विषयांसंदर्भात आज येथील जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जि.प.चे उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे, राज्य होमिओपॅथिक कौन्सिलचे सदस्य डॉ. अजित फुंदे यांच्यासह आरोग्य यंत्रणेतील विविध अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान, रुग्ण कल्याण समिती, गर्भलिंगपूर्व निदान चाचणी, हिवताप नियंत्रण कार्यक्रम, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृवंदना कार्यक्रम, आरोग्यवर्धिनी केंद्र, आयुषमान भारत, एकात्मिक रोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम अशा विविध बाबींचा तपशीलवार आढावा घेतला. रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था, रुग्णाच्या आजाराचे लवकर निदान, औषधांची उपलब्धता आणि आहार या चार गोष्टी आरोग्य सेवेच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असतात.

त्या दृष्टीने आरोग्य संस्थांचे बळकटीकरण आवश्यक आहे. विविध योजनेतील कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना त्याचा लाभ हा रुग्णांना व्हावा, यादृष्टीने आखणी व्हावी, असे त्यांनी सूचविले. जिल्ह्यात सध्या आपत्कालिन सेवेसाठी १०८ क्रमांकाच्या ४० अॅम्बुलन्सेस आहेत. मात्र, काही ठिकाणी प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध नसल्याने त्यांचा वापर होताना दिसत नाही. त्यामुळे अशा प्रकरणी संबंधित वरिष्ठ यंत्रणेच्या ही बाब लक्षात आणून पर्यायी व्यवस्था करण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांची बांधकामे सुरु आहेत, ही कामे वेळेत पूर्ण होऊन त्या इमारतींचा वापर सुरु होईल, यादृष्टीने कार्यवाही करावी. यासंदर्भात बांधकाम विभागाने त्यांच्या वरिष्ठांमार्फत संबंधित ठेकेदारांना समज द्यावी. आरोग्य यंत्रणेतील कामांना विलंब लागता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले. कोरोना कालावधीत सध्या आयुष उपचार पद्धतीचा वापर कोविड केअर सेंटरमध्ये केला जात आहे, रुग्णांना त्याचा लाभ होत असल्याची माहिती आरोग्य अधिकार्‍यांनी दिल्यावर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी समाधान व्यक्त केले.

जिल्ह्यात ०१ डिसेंबरपासून क्षयरोग रुग्ण आणि कुष्ठरोग रुग्ण शोधमोहिम राबविली जाणार आहे. आरोग्य यंत्रणांनी समन्वय साधून ही मोहिम मोठ्या प्रमाणात राबविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. जिल्ह्यातील शाळांच्या परिसर हा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीपासून मुक्त असला पाहिजे. त्यादृष्टीने सर्व शाळा परिसरांचा अहवाल येत्या आठवडाभरात देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कोरोना चाचण्यांची संख्या अधिक वाढविण्याची गरज आहे. यासंदर्भात यापूर्वीच सूचना देण्यात आल्या असून तालुकास्तरीय यंत्रणांनी त्या सूचनांची अंमलबजावणी करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment