Ahmednagar News : निळवंडे धरण बांधतानाच अनंत अडचणी आणण्याचे काम झाले. एका राजकीय नेत्याने निळवंडे धरण होणार नाही, असे सांगत थट्टा केली होती; परंतु तेच नेते आता निळवंडे धरणाच्या पाण्याचे पूजन करण्यात आघाडीवर आहेत.
राहुरी परिसरातील २१ गावांमध्ये हुलगे लावण्याची वेळ आणु, अशी भाषा ज्यांनी केली होती त्यांना ओळखा, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी ऊर्जा राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे होते. सभेच्या अध्यक्षस्थानी कानडगावचे ज्येष्ठ नागरीक पाटीलबा गागरे होते.
राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे पहिल्यांदाच पाणी आल्यानंतर आ. थोरात यांच्यासह आमदार तनपुरे यांनी लाभार्थी गावांना भेट दिली.
कानडगाव येथे निळवंडे कालव्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या दोन्ही नेत्यांवर जेसीबीने पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले. कानडगाव ग्रामस्थांसह सोनगाव, सात्रळ, तांदूळनेर, गणेगाव, चिचविहीरे, वडनेर, कनगर, तांभरे, निंधेरे आदी ग्रामस्थांकडून सन्मान आयोजित करण्यात आला होता.
आ. तनपुरे म्हणाले की, सन २०१९ साली भाजप शासन सत्तेवर होते, तेव्हा केवळ ७५ कोटी रूपयांचा निधी मिळाला होता; परंतु महाविकास आघाडी शासन सत्तेत येताच १२०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यानेच या धरणाचे काम पूर्ण झाले.
जिल्हा बँकेचे टॉनिक मिळताच आमच्या कामाचे फुकटचे श्रेय लाटण्यासाठी त्यांची भटकंती सुरू झाल्याची टीका आ. तनपुरे यांनी कर्डिलेचे नाव न घेता केली.
निळवंडे कालव्यांसाठी यांचे योगदान
कालवा कृती समिती, आमदार थोरात, माजी मंत्री जयंत पाटील, माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे निळवंडे कालवे होण्यामागे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या प्रयत्नाने आघाडी सरकारच्या काळात या कामांसाठी सर्वाधिक निधी मिळाला. – आमदार प्राजक्त तनपुरे