आमदार रोहित पवार हे आता संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व झाले आहे. त्यामुळे कर्जत-जामखेडच्या मतदारांनी राज्यामध्ये फिरण्यासाठी रोहित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन खासदार अमोल कोल्हे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चे आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून मिरजगाव (ता. कर्जत) येथील उपजिल्हा रुग्णालय, रस्ता व गोरगरीब विद्यार्थ्यांना सायकल वाटपाचा कार्यक्रम झाला.
यावेळी खासदार अमोल कोल्हे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील व खासदार नीलेश लंके, माजी आमदार नारायण पाटील, साहेबराव दरेकर, गुलाब तनपुरे, डॉ. पंढरीनाथ गोरे, बाळासाहेब साळुंखे, रघुनाथ काळदाते आदींसह नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
खा. कोल्हे पुढे म्हणाले की, राज्यातील जनतेने लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या शक्तीला पराभूत केले आहे. आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होणार आहे. महाराष्ट्रात महायुतीचा पराभव होऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येईल.
कर्जत-जामखेडच्या एमआयडीसीवर मंत्री म्हणून आ. रोहित पवार हेच सही करतील, हे मी आज या ठिकाणी जाहीर करतो. हे ऐकताच उपस्थित हजारो नागरिक व विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा गजर केला.
आ. रोहित पवार म्हणाले की, माझ्या विरोधकाने फक्त राजकीय द्वेषातून एमआयडीसी झाल्यानंतर रोहित पवार यांना क्रेडिट मिळेल, म्हणून कर्जत जामखेड एमआयडीसी अडवली. मात्र, तीन महिन्यानंतर पवार साहेब, उद्धव ठाकरे व काँग्रेस नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे.
त्यावेळी एमआयडीसी पेपरवर ज्या मंत्र्यांची सही पाहिजे होती, ते मंत्री कदाचित करणार नसतील, तर तीन महिन्यांनी जनतेच्या आशीर्वादाने शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्यासारख्या नवीन कार्यकर्त्याची सहीसुद्धा असू शकते, असे विधान करीत रोहित पवार यांनी स्वतःच्या मंत्रीपदाची घोषणाच जणू केली.
खा. नीलेश लंके म्हणाले, की कोणाचाही नाद करा, परंतु पवारांचा नाद करू नका. पवार एवढे सोपे नाहीत आपल्याला हे मागील निवडणुकीत दिसून आले आहे. तसेच पुढील काळात कर्जत-जामखेड मतदारसंघाची जबाबदारी मी घेण्यास तयार आहेअसेही यावेळी लंके म्हणाले. यावेळी खासदार धर्यशिल मोहिते यांचे देखील भाषण झाले.