Ahmednagar News : काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विशेष प्रयत्नातून महाविकास आघाडी सरकारच्या काळात संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीबिरोबा महाराज देवस्थानच्या सुशोभीकरणासाठी पर्यटन विकास योजनेंतर्गत ५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.
त्यामुळे या कामाचे श्रेय कुणी घेवू नये, असे मत माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात गोडगे म्हणाले, आमदार बाळासाहेब थोरात यांनी विशेष प्रयत्न करून महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये निळवंडे कालव्यांच्या कामाला गती देण्यासाठी मोठा निधी मिळविला.
त्यांच्यामुळेच कालवे पूर्ण झाले असून तळेगाव भागात डाव्या कालव्याद्वारे पाणी आले. याच काळात तालुक्यातील विविध रस्ते आणि विकास कामे यासाठी मिळाला. पर्यटन विकास योजनेअंतर्गत देवस्थान कामांसाठी निधी मिळविला.
तळेगाव दिघे येथील बिरोबा देवस्थान सुशोभीकरण व विविध विकास कामांसाठी ५ कोटी रुपये आणि धांदरफळ येथील रामेश्वर देवस्थानच्या विविध विकास कामासाठी ५ कोटी रुपये निधी मिळविला.
सदर कामाची प्रशासकीय मान्यता (दि.३१) जानेवारी २०२२ रोजी मिळाली. मात्र जुलैमध्ये सत्तांतर झाले आणि नव्याने आलेले सरकार आणि पालकमंत्री यांनी या कामांना स्थगिती दिली.
ही स्थगिती फक्त राजकारणासाठी होती. उच्च न्यायालयात जावून महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या व विद्यमान सरकारने स्थगिती दिलेल्या कामांची स्थगिती उठविण्यात आली.
सदर कामाला आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून नव्याने सुरुवात होणार असून या सुशोभीकरणामुळे बिरोबा देवस्थान व परिसरात अधिक सुंदर होणार असून हे मोठे पर्यटन स्थळ ठरेल, असा विश्वास व्यक्त करीत या कामाचे श्रेय आमदार थोरात यांचे आहे, असे महेंद्र गोडगे यांनी सांगितले.
संगमनेर तालुक्यातील विविध देवस्थानच्या सुशोभीकरणासाठी आमदार थोरात यांनी मिळविलेल्या निधीच्या कामाला स्थगिती देऊन भाजपा व पालकमंत्री यांनी देवस्थानच्या कामातही राजकारण केल्याची टीका, संगमनेर शेतकी संघाचे संचालक सचिन दिघे यांनी केली आहे.