आ. सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश ! पुणे – नाशिक महामार्गावर अपघाती मृत्यूच्या प्रमाणात होणार घट

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : आमदार सत्यजीत तांबेंच्या पुन्हा एकदा प्रयत्नांना यश आले आहे. संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावरील बोटा येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरला मंजूरी मिळाली आहे.

२५ जुलै २०२३ रोजी पावसाळी अधिवेशनादरम्यान डोळासणे / बोटा (संगमनेर) व वावी (सिन्नर) येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली होती. आता या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वाक्षरी करून हिरवा कंदिल दिला असून पुणे – नाशिक महामार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळणार आहे.

३० खाटांच्या या नियोजित ग्रामीण रुग्णालयासाठी शासन स्तरावरून स्वतंत्र पदनिर्मिती देखील केली जाणार आहे. राज्य सरकारच्यावतीने अपर सचिव कविता पिसे यांच्या सहीने आदेश शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणून बोटा प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करण्यास शासनाने मंजुरी दिली.

बोटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विस्तीर्ण आवारात ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय साकारण्यात येईल. त्यासाठी जागा अधिग्रहण, नवीन इमारत बांधकाम व पदनिर्मितीबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाईल, असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.

महामार्गांवरील अपघातांमधील जखमींचा जीव वाचविण्यासाठी आवश्यक असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी कधी करणार, अशी मागणी सातत्याने केली होती. अखेर वावी येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर तसेच बोटा येथे ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर यांना मंजूरी मिळाली असून लवकरच कामाला सुरूवात होईल. बोटा येथील ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर मंजूरी बाबत सरकारने शासन निर्णय जारी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मनापासून आभार मानतो, अशी माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली.

अपघातग्रस्तांना मिळणार तातडीने उपचार!

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. बोटा व वावी या दोन्ही ठिकाणी ट्रॉमा सेंटर मंजूर झाल्यामुळे या भागातील अपघातग्रस्त नागरिकांना तातडीने उपचार मिळतील. त्यांचे अनमोल आयुष्य वाचू शकेल. याकामी मला खारीचा वाटा उचलता आला, याचे मला समाधान वाटते. – आमदार, सत्यजीत तांबे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe