आरोग्य विभागाच्या संपूर्ण कामकाजाच्या चौकशीचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचे आदेश !

चौकशीसाठी तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन; सात दिवसात अहवाल सादर होणार

Published on -

Ahilyanagar News – महानगरपालिकेच्या आरोग्य सेवांमध्ये सुधारणा न केल्यामुळे व परिणामी रँकिंग घसरल्यामुळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांच्यावर कारवाईचा बडगा उभारत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

त्यानंतर आता आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी आरोग्य विभागाच्या संपूर्ण कामकाजाच्या चौकशीचे आदेश जारी केले आहेत. चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. सात दिवसात समितीला चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

डॉ. अनिल बोरगे यांना ऑगस्ट २०२४ मध्ये दोन वेळा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मुख्यत्वे महानगरपालिकेच्या आरोग्य कार्यक्रमांचे प्रतिमाह असणारे रँकिंग हे राज्यातील महानगरपालिकांच्या शेवटच्या पाच गुणानुक्रमे आलेले आहे. या प्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीसच्या अनुषंगाने सुधारणा करण्याबाबत निर्देश दिलेले होते.

तथापि यामध्ये त्यांची कुठलीही प्रगती दिसून आलेली नाही. तसेच त्यांनी दिलेले खुलासे असमाधानकारक आहेत. त्यांच्या गैरवर्तनाबाबत वेळोवेळी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येवून व वाजवी संधी देवून देखील त्यांच्या वर्तनामध्ये कोणताही सकारात्मक बदल व कामकाजामध्ये सुधारणा झाली नाही.

महाराष्ट्र शासनाकडील आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या महानगरपालिकांच्या रँकिंगमध्ये सुधारणा झालेली नाही. त्यांच्या विभागातील कर्मचा-यांवर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवणे ही विभाग प्रमुखाची जबाबदारी असताना ती पार पाडण्यात कसूर झालेला असल्याने व वारंवार होणा-या अशा वर्तनामुळे कामकाजावर विपरित परिणाम होवून महानगरपालिकेची उद्दिष्ट पुर्ती झालेली नाही, असा ठपका ठेवत डॉ. बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

आता आयुक्त यशवंत डांगे यांनी आरोग्य विभागाच्या संपूर्ण कामकाजाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यासाठी उपायुक्त विजयकुमार मुंडे, मुख्य लेखापरीक्षक विशाल पवार व प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर या अधिकाऱ्यांची चौकशी समिती नियुक्त केली आहे. येत्या सात दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश समितीला देण्यात आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News