Ahmednagar News : विविध मागण्यांसाठी आक्रमक होत ग्रामपंचायत मधील संगणक परिचालक संपावर गेले आहेत. मागील १५ दिवसांपासून बेमुदत संपावर हे सर्व कर्मचारी गेले आहेत. त्यामुळे सध्या नागरिकांचे विविध ऑनलाईन कामे रखडली आहेत.
कोपरगाव तालुक्याचा विचार करता तब्बल ७५ ग्रामपंचायतींमध्ये विविध प्रकारचे दाखले व ग्रामपंचायत स्तरावरील नमुने ऑनलाइन केले गेले आहेत. परंतु या संपामुळे हे सगळे काम ठप्प झाले असून तालुक्यातील ७५ ग्रामपंचायती ऑफलाइन झाल्या आहेत.

* परिचालकांचे काय असते काम?
ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या पूर्वीच्या संग्राम व सध्याच्या आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात १२ वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर ग्रामविकास विभागाने नेमून दिलेले काम संगणक परिचालक करत असतात. परंतु आता संपामुळं हे काम ठप्प आहे.
* का केला आहे संप?
– संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन देण्यासाठी सुधारित आकृतिबंध लागू करावा.
– २२ हजार ६०० रुपये मासिक मानधन कर्मचारी दर्जा वेतन मिळेपर्यंत दिले जावे
– नव्याने सुरू केलेली चुकीची टार्गेट सिस्टीम रद्द करून पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या जुन्या संगणक परिचालकांना नियुक्ती देऊन प्रलंबित मानधन त्वरित द्यावे आदी मागण्यांसाठी हा संप केला आहे.
* परिचालक म्हणतात…
ग्रामपंचायतीचे ऑनलाइन ऑफलाइन काम व इतर अनेक कामे करूनही महागाईच्या काळात मासिक केवळ ६ हजार ९३० रुपये दिले जातात. ही छोटी रक्कम असून यात कुटुंब चालत नाही. वर्षानुवर्ष शासन आमच्या अनेक मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. आम्हाला दिले जाणारे मानधन मजुरांपेक्षाही कमी आहे असे म्हटले आहे.