Ahmednagar News : नगर महापालिकेने शहरातील सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या ९०१ पैकी तब्बल २४४ शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या. त्या जागी नव्याने कर्मचारी नियुक्त केले आहेत.
त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना बुधवारी (२४ जानेवारी) पुन्हा प्रशिक्षण द्यावे लागले. मनपा शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे हा गोंधळ उडाल्याचे सांगण्यात आले. सर्वेक्षणाच्या कामाचा पहिल्याच दिवशी बोजवारा उडाला. आता दुसऱ्या दिवशी नव्याने २४४ जणांच्या नियुक्त्या केल्याने त्यांचेही दोन दिवस वाया गेले आहेत.
शहरातील सुमारे एक लाख कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रगणक व पर्यवेक्षक असे ९०१ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. यात मोठ्या प्रमाणावर शिक्षकांचा समावेश आहे. कर्मचारी नियुक्त करण्यापूर्वी शिक्षण विभागाकडून खासगी शाळांच्या शिक्षकांची नावे मागवण्यात आली होती.
एका शाळेतील ५० टक्क्यांपेक्षा अधिक शिक्षक यादीत घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या यादीत एकाच शाळेतील बहुसंख्य शिक्षकांची नावे देण्यात आली, त्याचा परिणाम शाळांच्या दैनंदिन कामकाजावर झाला.
काही मनपा कर्मचाऱ्यांनीही सर्वेक्षण करण्यासाठी असमर्थता दर्शविली, कामगार युनियनकडून शिपाई, सफाई कामगारांच्या नियुक्तीला आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे अखेर बुधवारी मनपाकडून जुन्या नियुक्त्या रद्द करून नव्याने २४४ कर्मचारी नियुक्त केले.
त्यांना बुधवारी प्रशिक्षण देण्यात आले. आता त्यांचे मोबाईल क्रमांक अॅपवर अपडेट करण्यासाठी गोखले संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत. ते अपडेट झाल्यावर हे कर्मचारी गुरुवारपासून काम सुरू करणार आहेत. ३१ जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश आहेत.
मात्र, महापालिका शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे दोन दिवस २४४ प्रगणक गटातील सर्वेक्षण होऊ शकले नाही. तेथील दोन दिवस वाया गेले आहेत. दरम्यान, सायंकाळपर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार शहरात सुमारे साडेनऊ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण दोन दिवसात झाल्याचे सांगण्यात आले.