अहिल्यानगरमध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट मोहिमेत गोंधळ

Published on -

अहिल्यानगरमध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवण्याची मोहीम वाहनांच्या ऑनलाइन नोंदणीअभावी मंदावली आहे. परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी ही नंबर प्लेट अनिवार्य केली असून, यासाठी ३० जून २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

जिल्ह्यात सुमारे ४ लाख वाहने २०१९ पूर्वी नोंदणीकृत आहेत, परंतु आतापर्यंत केवळ १,२०० वाहनांनाच ही नंबर प्लेट बसवण्यात आली आहे. वाहनांची ऑनलाइन नोंदणी न झाल्याने ही प्रक्रिया रखडली असून, वाहनचालकांना नंबर प्लेट मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

ऑनलाइन नोंदणीसाठी आरटीओ कार्यालयात आरसी बुक, पीयूसी आणि विम्याची पावती सादर करावी लागते, तर १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना पर्यावरण कर भरणेही बंधनकारक आहे. यानंतरच नंबर प्लेटसाठी अर्ज करता येतो आणि संबंधित सेंटरवरून ती उपलब्ध होते, परंतु या प्रक्रियेत अनेक अडथळे येत असल्याचे दिसून येते.

या मोहिमेत आणखी गोंधळाची भर म्हणजे २०१९ नंतरच्या वाहनांबाबतचा संभ्रम. परिवहन प्रशासनाच्या मते, १ एप्रिल २०१९ नंतर नोंदणीकृत वाहनांना एचएसआरपी आधीच बसवलेली असते, त्यामुळे त्यांना नव्याने नंबर प्लेटची गरज नाही.

मात्र, प्रत्यक्षात २०१९ नंतरच्या अनेक वाहनांवरही ही नंबर प्लेट बसवलेली नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. अशा वाहनांचे काय करायचे, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.

दुसरीकडे, नंबर प्लेटसाठी अर्ज करणाऱ्या वाहनचालकांना सेंटरवरून “तारीख पे तारीख” मिळत असून, ठरलेल्या दिवशी गेल्यावर “नंबर प्लेट अजून आलेली नाही,

आल्यावर बसवून देतो” अशी उत्तरे मिळत आहेत. यामुळे नागरिकांना सेंटरचे हेलपाटे मारावे लागत असून, प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर नाराजी व्यक्त होत आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe