Ahmednagar News : आयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारुन काँग्रेस पक्षाने रामभक्तांचा एकप्रकारे अपमान केला आहे. देशात आता काँग्रेसने कितीही यात्रा काढल्या तरी, आहे तेवढे खासदार सुद्धा निवडून येवू शकणार नाहीत.
खा. राहुल गांधी यांच्या यात्रेमुळे उरले-सुरले राज्यही त्यांच्या ताब्यातून जनता हिसकावून घेईल, अशी टिका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
रविवारी (दि.१४) नगर येथे आयोजित केलेल्या महायुतीच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर नगर जिल्ह्यातील घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथे काल गुरूवारी (दि.११) बैठक पार पडली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या बैठकीस खासदार सदाशिव लोखंडे, आमदार आशुतोष काळे, ‘भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपील पवार, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे, सरचिटणीस नितीन दिनकर,
महिला आघाडीच्या कांचनताई मांढरे, शिवसेनेच्या कावेरी नवले, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या स्वाती शेनकर, प्रकाश चित्ते, आबासाहेब थोरात यांच्यासह सर्व तालुक्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित होते. यावेळी मंत्री विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील ९ वर्षात देशाने जगामध्ये एक स्वतंत्र प्रतिमा निर्माण केली आहे.
आज बहुतांशः देश देशामध्ये गुंतवणूकीसाठी इच्छुक झाले आहेत. या माध्यमातून रोजगाराची उपलब्धता देशामध्ये निर्माण होत आहे. अशा सर्व पार्श्वभूमीवर २०२४ साली मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांना कटीबध्द व्हावे लागेल. त्यादृष्टीने राज्यातील ३६जिल्ह्यामध्ये रविवारी होणारे मेळावे हे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या संदर्भात राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचे स्वागत करुन, मंत्री विखे पाटील म्हणाले की, या निकालामुळे राज्यातील महायुतीचे सरकार अधिक मजबुत झाले आहे. सरकार पडणार म्हणून अनेक भविष्यकार वेगवेगळ्या तारखा देत होते.
पण त्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वल्गना कालच्या निकालाने हवेत उडून गेल्या असल्याची टिका करुन, या निकालामुळे सत्याचा विजय झाल्याचे त्यांनी सांगितले. येत्या २२ तारखेला श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा गावोगावी आनंदाने साजरा करा, असे आवाहन करुन ना. विखे पाटील म्हणाले की,
आयोध्येतील कार्यक्रमाचे निमंत्रण काँग्रेस पक्षाने नाकारणे म्हणजे हा भारतीय आणि रामभक्तांचा अपमान आहे. ज्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा श्वास सुद्धा प्रभू श्रीरामचंद्र होते. त्यामुळे रविवारी होत असलेल्या महायुतीच्या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकत्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी खासदार लोखंडे यांच्यासह सर्व जिल्हा प्रमुखांची भाषणे झाली. आ. आशुतोष काळे यांनी आभार मानले.