अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- जीवनावश्यक पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासून लोकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर शासनाने खासगीकरणाचा घाट घातला आहे.
याविरोधात नगरच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच सध्या ऐन दिवाळीच्या काळात कंत्राट नूतनीकरण न केल्याने अधिकारी व कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. नगरमध्ये यासाठी २५ ऑक्टोबर रोजी भीक मांगो आंदोलन केले जाणार आहे.
राज्यातील एकूण ५१४ कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपली उपजीविका वाचवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याबाबत राज्यभरात आंदोलने सुरू आहेत.
नगरच्या कर्मचाऱ्यांनी भूजल सर्वेक्षण कार्यालयासमोर मागण्या पूर्ण होण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
जिल्ह्यातील कर्मचारी ८ ते ९ वर्षांपासून कंत्राटी तत्वावर अत्यंत अल्प मानधनावर कार्यरत आहेत.
त्यांना मानधनात वाढही मिळत नाही. सन २०१२ पासून त्यांनी प्रयोगशाळेसाठी योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांची नियुक्ती बाह्यस्त्रोताद्वारे करु नये, अशी मागणी केली आहे.
नगरच्या कर्मचाऱ्यांनी आमदार निलेश लंके, खासदार सुजय विखे यांना भेटून आपले म्हणणे व मागण्या सांगितल्या आहेत. त्यांनीही हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.
नगरच्या आंदोलनात जिल्हा समन्वयक कल्पना वाघ यांच्यासह अमृता काशिद, योगेश झळके, श्रद्धा जोशी, शिवाजी बडे, शितल कावरे, महेश घुले, विशाल पटेकर, गणेश सूळ, संतोष घुगे, योगिता लोणकर, रणजित आढाव, सतीश बिटके सहभागी होणार आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम