पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट ! पाथर्डीत कडकडीत बंद

Published on -

भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याविषयी पाथर्डी तालुक्यातील शिरापुर येथील युवकाने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने तालुक्यात तणाव निर्माण झाला असून, या घटनेच्या निषेधार्थ व या तरुणाला अटक करून त्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी सकल वंजारी समाज, ओबीसी समाजाच्या व मुंडे समर्थकांच्या वतीने पाथर्डी बंद पाळण्यात आला.

या बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला आज पाथर्डी शहर दिवसभर कडकडीत बंद होते. यावेळी सर्वपक्षीय मुंडे समर्थकांच्या वतीने पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मुंकुद गर्जे, गोकुळभाऊ दौंड, दिलीप खेडकर, अरुण मुंडे, अमोल गर्जे, अ

रुण मिसाळ, अर्जुन धायतडक, प्रतिक खेडकर, भाऊसाहेब शिरसाठ, संजय बडे, गहिनीनाथ शिरसाठ, हरीहर गर्जे, मृत्युंजय गजें, माणिकराव खेडकर, किसन आव्हाड, शिवनाथ गर्जे, विजय शिरसाठ आदींसह हजारो मुंडे समर्थक सहभागी झाले होते.

शहरातील नाईक चौकातून सकाळी निषेध मोर्चाला सुरुवात झाली. हजारो मुंडे समर्थकांनी पोलीस स्टेशन वर जात पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना निवेदन दिले. यावेळी मोर्चेक यांनी सदर तरुणाला अटक करून कडक कायदेशीर कारवाई करावी व यापुढील काळात जातीय तणाव निर्माण होणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी अशी मागणी केली.

दोन लहान मुलांच्या हस्ते यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी बोलताना मुटकुळे म्हणाले की, मत मोजणी पुर्वी पोलीस प्रशासनाकडून सर्व समाजाला शांततेचे आवाहन करण्यात आले होते. सर्व निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली आहे या पुढील काळात समाजातील सर्व घटकांनी व जाती धर्मातील लोकांनी जातीय सलोखा पाळावा.

कुणीही सामाजिक शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी. या प्रकरणात पोलिसांनी पुढाकार घेऊन सदर तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. याप्रकरणी कारवाई केली जाईल, लवकरच त्याला अटक होईल व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मुटकुळे यांनी यावेळी दिले.

यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. शिरापूर येथील एका तरुणाने मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकली होती त्यामुळे संतप्त झालेले शेकडो युवक काल रात्री पोलिस स्टेशनला जमा झाले. वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्याकडे केली होती

यावेळी काही काळ शिरापुर व पोलिस स्टेशनलाही तणाव निर्माण झाला होता. या घटनेचे तालुक्यात तीव्र प्रतिसाद उमटले या घटनेच्या निषेधार्थ पाथर्डी बंदची हाक दिली. बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सकल ओबीसी समाज, सकल वंजारी समाज, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, लोकनेता महोत्सव समिती व दैवत फाउंडेशन यांनी केले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!