साईबाबांबद्दल केले वादग्रस्त विधान ! मनोहर कुलकर्णी ऊर्फ भिडे गुरुजीवर शिर्डीत गुन्हा दाखल

Ahmednagar News : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर कुलकर्णी ऊर्फ भिडे गुरुजीने अमरावती येथील एका व्याख्यानात साईबाबांविषयी अतिशय खालच्या पातळीवर अपशब्द काढले. त्यामुळे सर्वपक्षीय शिर्डी ग्रामस्थांनी साईंबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी केल्यानंतर संस्थानच्या वतीने शिर्डी पोलीस ठाण्यात भिडेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की भिडे गुरुजी यांनी अमरावती येथील आपल्या व्याख्यानात सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेल्या श्री साईबाबांबद्दल अतिशय खालच्या पातळीवर भाष्य केले. त्यामुळे शिर्डी ग्रामस्थांसह जगभरातील लाखो करोड़ो भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहचली. त्यांच्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी सोमवार दि. ३१ जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजता हनुमान मंदिराजवळ शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले होते.

यावेळी श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांची भेट घेऊन भिडे यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जाधव यांनीही तातडीने त्रिसदस्यीय समितीच्या अध्यक्षांशी फोनवर चर्चा करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली व जनसंपर्क अधिकारी, साईमंदिर सुरक्षा अधिकारी आणि विधी अधिकारी यांना शिर्डी पोलिस स्टेशनला रवाना केले. साईमंदिर सुरक्षेचे प्रमुख अधिकारी उपनिरीक्षक अण्णासाहेब परदेशी यांच्या तक्रारीवरून भिडे गुरुजी यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ६९७ / २०२३ नुसार भा. दं.वि. कलम २९५ (अ), १५३ (अ), २९८, ५०० प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सर्वपक्षीय शिर्डी ग्रामस्थांनी शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधीक्षक संदीप मिटके यांना निवेदन दिले असून भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. यावेळी शिर्डी ग्रामस्थांसह साईभक्तांनी भिडे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करत आपल्या भावना व्यक्त केल्या. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे करत आहेत.

श्री साईबाबा हे आमचे दैवत आहे. जगभरातील लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांवर भिडे गुरुजींनी जे वक्तव्य केले आहे, त्याचा आम्ही सर्व शिर्डीकर जाहीरपणे निषेध करतो. त्यांच्या या वक्तव्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भविष्यात त्यांनी साईबाबांबद्दल कोणत्याही प्रकारचे वक्तव्य केले, तर शिर्डीकर त्यांना माफ करणार नाही.- कैलासबापू कोते, माजी नगराध्यक्ष, शिर्डी