श्रीगोंदा- संत शेख महंमद महाराज मंदिराच्या नूतनीकरणाचा वाद चिघळला आहे. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी गुरुवारी (दि. १७) भव्य मोर्चा काढण्यात येणार असून, त्याच दिवशी श्रीगोंदा शहर अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिराचे बांधकाम सुरू होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.
सोमवारी श्रीगोंद्यात मंदिराच्या नूतनीकरणाबाबत एक बैठक पार पडली. यावेळी संत शेख महंमद महाराज ट्रस्टचे अध्यक्ष अमीन शेख यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. बंटी बोरुडे आणि सुभाष आळेकर यांनी मंदिराचे काम सुरू होईपर्यंत मंदिर बंद ठेवण्याची ठाम भूमिका मांडली.

बैठकीत निर्णय
या बैठकीत नानासाहेब कोथिंबिरे, सुनीता शिंदे, राजू गोरे, प्रा. संजय लाकूडझोडे, संतोष खेतमाळीस, आजीम जकाते, एम. डी. शिंदे, नंदकुमार ताडे, एकनाथ आळेकर, अरविंद कापसे, प्रदीप खामगळ, मीरा शिंदे, अय्याज शेख, दिलीप डेबरे, ज्योती खेडकर, भूषण महाराज महापुरुष, बापू माने, कांतीलाल कोथिंबिरे, कालिदास कोथिंबिरे यांनी आपली मते मांडली.
शहर बंद ठेवण्याचा निर्णय
यात्रेसाठी गोळा केलेली वर्गणी अमीन शेख यांनी खंडणी संबोधल्याचा आरोप करत, ही बाब दुर्दैवी असल्याचे बाबासाहेब भोस, उपाध्यक्ष, नागवडे साखर कारखाना यांनी सांगितले. मंदिराच्या नूतनीकरणासाठी अभूतपूर्व मोर्चा काढण्याची गरज असून, काम पूर्ण होईपर्यंत शहर बंद ठेवण्याचा निर्णय योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचे आवाहन
मंदिराच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकत्र येऊन सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. शांतपणे चर्चा करून, परस्पर विश्वासाने मार्ग काढावा, असे मत आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी व्यक्त केले.
गावकरी आतापर्यंत संयमाने वागले आहेत, परंतु अमीन शेख यांचा मंदिराच्या नूतनीकरणाला विरोध कायम आहे. आता गावकऱ्यांचा संयम संपला असून, यापुढे कव्वाली व इतर कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ज्येष्ठ काँग्रेस नेते घनश्याम शेलार यांनी स्पष्ट केले.