अहिल्यानगरमधील ‘या’ सहकारी बँकेत पुन्हा एकदा तांबेचीच सत्ता! ९ महिन्यांतच बदला घेत बंडखोरांना चारली धूळ

शिक्षक बँकेच्या निवडणुकीत बापूसाहेब तांबे गटाने सत्ता पुन्हा काबीज केली. बाळासाहेब तापकीर अध्यक्ष आणि योगेश वाघमारे उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले. सरोदे गटाचे चार संचालक फुटल्यामुळे तांबे गटाला विजय मिळाला.

Published on -

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील ११ हजार शिक्षकांचे आर्थिक केंद्र असलेल्या जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत नऊ महिन्यांनंतर पुन्हा राजकीय उलथापालथ झाली. गुरुमाऊली गटाचे नेते बापूसाहेब तांबे यांनी गमावलेली सत्ता पुन्हा मिळवली. त्यांच्या गटाचे बाळासाहेब तापकीर (कर्जत) यांची अध्यक्षपदी, तर योगेश वाघमारे (राहाता) यांची उपाध्यक्षपदी १२-८ अशा मतांनी निवड झाली. विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब सरोदे यांच्या गटातील चार संचालकांनी पाठ फिरवल्याने त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

अंतर्गत मतभेदामुळे सत्ता गमावली

ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या बँकेच्या निवडणुकीत २१ संचालक पदांसाठी चुरस पाहायला मिळाली. तांबे यांच्या गुरुमाऊली गटाने २० जागा जिंकत एकहाती सत्ता स्थापन केली, तर विरोधी डॉ. संजय कळमकर गटाला केवळ एक जागा मिळाली. तांबे यांनी प्रत्येक संचालकाला एक वर्ष अध्यक्षपदाची संधी देण्याचे धोरण स्वीकारले. त्यानुसार संदीप मोटे आणि ज्ञानेश्वर चोपडे यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. मात्र, जुलै २०२४ मध्ये नवीन पदाधिकारी निवडीच्या वेळी तांबे गटात अंतर्गत मतभेद उफाळले.

संचालकाची बंडखोेरी

तांबे गटातील श्रीरामपूरचे संचालक बाळासाहेब सरोदे यांनी बंडखोरी करत अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली आणि १२-८ अशा मतांनी ते निवडून आले. हा तांबे यांच्यासाठी मोठा धक्का होता, कारण त्यांची एकहाती सत्ता संचालकांमधील असमन्वयामुळे डळमळली. सरोदे यांनी नऊ महिने अध्यक्षपद सांभाळले. या काळात डॉ. संजय कळमकर आणि रावसाहेब रोहोकले यांच्या गटाने शिक्षक संघाच्या माध्यमातून सरोदे यांना पाठिंबा देत बँकेत समन्वयाचे राजकारण राबवले. दरम्यान, तांबे गटातील तीन संचालकांनी सरोदे गटात प्रवेश केल्याने त्यांचे संख्याबळ १५ झाले होते.

तांबेची राजकीय चाल

बुधवारी (२३ एप्रिल) बँकेच्या सभागृहात उपनिबंधक गणेश पुरी यांच्या उपस्थितीत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. तांबे गटाकडून बाळासाहेब तापकीर (अध्यक्ष) आणि योगेश वाघमारे (उपाध्यक्ष), तर सरोदे गटाकडून भाऊराव राहिंज (अध्यक्ष) आणि माणिक कदम (उपाध्यक्ष) यांनी उमेदवारी दाखल केली. सरोदे गटाकडे १५ संचालक असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, तांबे यांनी सरोदे गटातील तीन संचालकांना परत आणण्यासह आणखी चार संचालकांना आपल्याकडे वळवले. यामुळे तापकीर आणि वाघमारे यांना १२, तर राहिंज आणि कदम यांना ८ मते मिळाली. एक मतपत्रिका कोरी आढळली.

विजयानंतर आभार सभा

विजयानंतर तांबे गटाने आभार सभा घेतली. राज्य उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट यांनी अध्यक्षस्थान भूषवले, तर बापूसाहेब तांबे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. अर्जुनराव शिरसाठ, बाबासाहेब खरात आणि विद्याताई आढाव यांनी निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी रा. वि. शिंदे, संतोष दुसुंगे, बबन गाडेकर, आबासाहेब दळवी, संदीप मोटे, अण्णासाहेब आभाळे, शशिकांत जेजुरकर, गोकुळ कळमकर, राजेंद्र शिंदे, रविकिरण साळवे, संतोष दळे, नारायण पिसे, प्रकाश नांगरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

नेत्यांचे मत

“मागील नऊ महिन्यांतील घडामोडींमध्ये काही बाह्य हस्तक्षेप झाला, पण सभासदांनी ते लवकर ओळखले. आता गुरुमाऊली सदिच्छा मंडळाच्या जाहीरनाम्याप्रमाणे पुढील दोन वर्षे बँक उत्कृष्ट कामगिरी करेल,” असे बापूसाहेब तांबे यांनी सांगितले.

तर काही संचालकांच्या वाढत्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही, त्यामुळे त्यांनी साथ सोडली. तरीही, नऊ महिन्यांच्या कार्यकाळात सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. आता विरोधी बाकावरून सत्ताधाऱ्यांवर लक्ष ठेवू,” असे मावळते अध्यक्ष बाळासाहेब सरोदे यांनी नमूद केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News