१ मार्च २०२५ करंजी : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील बस स्थानक परिसरात अनेक दिवसापासून सुरू असलेले देशी दारूचे दुकान गावाच्या बाहेर दोन तीन किलोमीटर पर्यंत हलवण्यासाठी गावातील महिला ग्रामपंचायत सदस्यांनी व ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतकडे तक्रार केली आहे.
या अनुषंगाने शनिवार (दि. ८) मार्च रोजी उत्तरेश्वर सभामंडपामध्ये महिलांची ग्रामसभा आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सरपंच नशीम शेख यांनी दिली आहे.करंजी येथील देशी दारूचे दुकान गावाच्या बाहेर किमान दोन तीन किलोमीटर पर्यंत हलवण्यात यावे यासंदर्भात विरोधी गटाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी व काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला निवेदन दिलेले आहे.

याच देशी दारू दुकानाच्या संदर्भात ग्रामपंचायतने ठोस निर्णय घ्यावा यासाठी विरोधी गटाच्या सदस्यांनी 3 मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा देखील इशारा दिला आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाने देखील सावध पवित्रा घेत देशी दारूचे दुकान गावाबाहेर काढण्याचे दृष्टीने सकारात्मक भूमिका घेत.
शनिवारी 8 मार्च रोजी ग्रामसभेचे आयोजन केले असून या ग्रामसभेसाठी पोलीस प्रशासन महसूल विभाग यांना देखील आमंत्रित करण्यात आले असून गावातील महिला भगिनींनी देखील या ग्रामसभेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन सरपंच नसीम शेख यांनी केले आहे.