अतिवृष्टी पाठोपाठ ढगाळ हवामानाचे शेतकऱ्यांवर पुन्हा संकट!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2021 :- मागील काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची घरे, शेत जमीन, पिके, जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने प्रचंड नुकसान झाले होते.

या आपत्तीच्या धक्क्यातून कुठेतरी शेतकरी सावरत असतानाच परत एकदा शेतकऱ्यांवर ढगाळ वातावरणाचे संकट डोळे वटारत असल्याने आता काय करावे या विचारात शेतकरी पडला आहे.

अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या तुरीच्या पिकापासून शेतकऱ्यांना उत्पादनाची मोठी आशा आहे. सध्या तुरीचे पीक जोमात असून, शेंगा भरायला सुरुवात झाली आहे.

मात्र, सध्याच्या ढगाळ वातावरणाचा तुरीच्या पिकाला फटका बसू लागला आहे. तुरीच्या शेंगा तयार होण्याच्या कालावधीत ढगाळ वातावरणामुळे कीडरोग प्रादुर्भावामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येण्याची शक्यता आहे.

अतिवृष्टी पाठोपाठ ढगाळ हवामानामुळे तुरीच्या पिकावर पुन्हा एकदा संकट आल्याने बळीराजा चिंताग्रस्त आहे. चालू वर्षीच्या खरीप हंगामात अनेक परिसरात सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस राहिल्याने खरीप पिकाची पेरणी करण्यात आली; परंतू मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

कापूस पिकावरील होणारा खर्च, वाढती मजुरी तसेच बोंडअळीचा प्रादुर्भाव असला तरी तुरीच्या क्षेत्रामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे.

परंतू ढगाळ हवामान व धुक्यामुळे तुरीच्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने, उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.त्यामुळे बळीराजावरील संकटाची मालीका काही थांबत नसल्याचे सध्या तरी चित्र दिसत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News