श्रीरामपूर तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने जे पेरले ते उगवेना, जे उगवले, ते आता तग धरेना अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर आषाढ सरींनी पिकांना जीवदान मिळाले असले तरी तालुक्यात अद्यापही पाहिजे असा दमदार पाऊस झाला नसल्याने विहिरींची पाणी पातळी वाढली नाही. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरीही तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात एक पाऊस झाला आणि यावर्षी चांगला पाऊस येईल या आशेवर शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस आदींसह खरिपाची पेरणी केली होती. मात्र, त्यानंतर किरकोळ पाऊस झाला. काहींनी पेरलेले उगवले, तर काहींनी पेरलेले अद्यापही अंकुरलेले नाही.
यावर्षी २३ हजार ४९१ हेक्टर खरीप पेरणीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी सोयाबीन १० हजार ९१९ हेक्टर, कपाशी ६ हजार ७०४ हेक्टर, मका ३ हजार ९०० हेक्टर, तर बाजरी ९१.२ हेक्टर अशी ७२ टक्के पेरणी झाली आहे.
तर तालुक्यात पाऊसही अत्यल्प झाला आहे. श्रीरामपूर मंडळात २१५, बेलापूर मंडळात १८६, उंदिरगाव २०९, टाकळीभान मंडळात २१८ मिमी असा सरासरी २०७.७ मिमी पाऊस झाला. मागील वर्षी सोयाबीनच्या भावाने शेतकऱ्यांना रडवले. सोयाबीन पिकासाठी एकरी सरासरी १२ ते १५ हजार रुपये खर्च येतो.
मात्र, आजच्या भावाचा विचार करता एकरी २० ते २२ हजारांचे उत्पन्न मिळू शकते. मात्र, पीक हातात येईपर्यंत खात्री नसते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबिनकडे पाठ फिरवली आहे. या उलट कापसाला जरी भाव कमी मिळाला असला तरी उत्पादन चांगले निघते. उत्पन्नही मिळते असे चित्र आहे. म्हणून यावर्षी सोयाबीन पेक्षा कपाशी कडे शेतकऱ्यांचा ओढा दिसत होता.
मात्र सोयाबीनची पेरणीही मुबलक प्रमाणात झाली. दरम्यान, उन्हाळी आवर्तनही पुरेसे मिळाले नसल्याने तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. जलसंपदा विभागाने आवर्तनाचे व्यवस्थित नियोजन न केल्याने नको तिकडे पाण्याची उधळपट्टी झालेली आहे. आता धरणातून पाणी सोडल्याने आवर्तनाची आशा पल्लवीत झाल्या आहेत.
कालवे, चाऱ्याना पाणी सोडा
प्रवरा नदी पात्रात सध्या मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आलेला आहे. यापूर्वी नदीसोबत कालवे, ओढे व चाऱ्याना पाणी सोडले जायचे. मग ते नदीपात्रात जात होते. आता मात्र ओव्हरफ्लो सुरू असूनही चाऱ्याना व ओढ्या नाल्याना पाणी सोडले जात नाही. त्यामुळे परिसरातील पाणी पातळी वाढली जात नाही. आता पाणी सोडले असल्याने ही पद्धती अवलंब करावी, अशी मागणी श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.