अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar Crime :- नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मोहटा देवी हे प्रसिद्ध देवीचे मंदिर आहे, या ठिकाणी भाविक मोठ्या संख्यने दर्शनासाठी येत असतात. मात्र या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे.
मोहटादेवीच्या दर्शनासाठी आलेल्या भविकांना येथील नारळ विक्रेत्यांनी किरकोळ कारणावरून जबरमारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत एका महिलेसह तीनजण जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी , शुक्रवारी रात्री गणेश कांताराम कातार (रा.बोरगाव बाजार ता. सिल्लोड) हे नातेवाईकांसह मोहटा देवीच्या दर्शनासाठी आले होते.
त्यांनी देवीगडावर असलेले नारळ विक्रेते पांडुरंग दहिफळे यांच्याकडून नारळ विकत घेतले. दहिफळे यांनी दिलेले काही नारळ कातार यांनी बदलून मागितल्याचा राग येऊन दहीफळ व त्यांच्या सोबत असलेल्या एका महिलेने व पुरुषाने कातार व त्यांच्या नातेवाईकांना लाकडी काठीने मारहाण केली.
या मारहाणीत कातार यांच्यासह पूजा गणेश कातार व वैजिनाथ कातार हे जखमी झाले. गणेश कातार यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी पांडुरंग दहिफळे यांच्यासह दोघाजणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नायक निलेश म्हस्के हे करत आहेत.