कर्जत तालुक्यात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन तहसीलदार गुरू बिराजदार यांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने अनेक ठिकाणी जलस्रोतांची पातळी खालावली असून, ग्रामपंचायत हद्दीतील साठवण तलावांचे पाणी जून २०२५ पर्यंत पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या तलावांमधून अवैध आणि अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला असून, यासाठी मिरजगाव आणि कर्जत पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तहसीलदार बिराजदार यांनी सर्व प्रशासकीय विभागांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. गावपातळीवरून तलावातील पाण्याचा अवैध उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामुळे ग्रामस्थ आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून, काही ठिकाणी आंदोलनाची चिन्हे दिसत आहेत.
या पार्श्वभूमीवर, बिराजदार यांनी पाणी उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. मोटार पंपाद्वारे पाणी उपसा करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी कर्जत आणि मिरजगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.
या पथकांमध्ये महसूल, पोलिस, महावितरण आणि पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे. ही कारवाई आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत केली जाणार आहे.
तहसीलदार बिराजदार यांनी स्पष्ट केले की, भरारी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्यास त्यांच्यावरही आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम ५१ ते ६० अंतर्गत कारवाई केली जाईल.
या कायद्यांतर्गत कर्तव्यात हलगर्जीपणा करणे किंवा आदेशांचे पालन न करणे यासारख्या बाबींना शिक्षा ठोठावली जाऊ शकते. यामुळे पथकातील सर्वांना जबाबदारीने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
उन्हाच्या वाढत्या तापमानामुळे तालुक्यातील जलस्रोतांवर ताण वाढला आहे. तलावातील पाणी हे प्रामुख्याने पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येत असून, त्याचा इतर कारणांसाठी वापर रोखण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत.
ग्रामस्थांच्या मते, अवैध पाणी उपसा थांबवल्यास पाणीटंचाईवर काही प्रमाणात नियंत्रण मिळू शकेल. तहसीलदार बिराजदार यांनी प्रशासनाच्या या निर्णयामुळे परिस्थिती सुधारेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.