Ahmednagar News : क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करणे ही मोठी समस्या नगर जिल्ह्यातील आहे. मागील अनेक काळापासून यावर निर्बंध टाकावेत अशी मागणी केली जात आहे. परंतु कायदेशीर कारवाई म्हणावी अशी होत नसल्याने अवजड वाहनांमधून भरमसाठ,
क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक केली जात आहे. अशाच क्षमतेपेक्षा अधिक वजनाच्या ऊसाच्या वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये वीजवाहक तारा अडकून स्पार्किंग झाले. नेवासे तालुक्यातील घोडेगाव ते सोनई या रस्त्यावर शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना झाली.
त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात विजेच्या ठिणग्या पडत होत्या. तब्बल अर्धा तास हा खेळ सुरू होता. त्यामुळे या रस्त्यावर अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती.
* नेमके काय घडले !
घोडेगावातून सोनई व शनिशिंगणापूरला जाणाऱ्या रस्त्यावर कमानीजवळ पंचरत्न वाईन शॉपजवळ ट्रक आला. यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त ऊस भरलेला होता. यात तारा अडकल्या व स्पार्किंग सुरु झाले. परिसरात त्यामुळे खळबळ उडाली.
नागरिकांनी त्वरीत महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला. महावितरण कंपनीचे कर्मचारी खंडागळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत विद्युतपुरवठा खंडीत केला. टँकरवर चढून लोंबकळणाऱ्या तारा तोडल्या. रात्रभर या परिसरातील वीजेचा पुरवठा खंडीत ठेवण्यात आला होता.