१३ मार्च २०२५ अहिल्यानगर : शहरातला सगळ्यात जास्त वर्दळ असलेला प्रमुख महामार्ग नगर-मनमाड रोड वर पत्रकार चौक ते एमआयडीसी पर्यंतच्या सह्याद्री चौकापर्यंत मागील चार महिन्यांपासून रस्त्यावरील खांबावरचे दिवे बंद आहेत म्हणून या रस्त्यावर अंधार असून या रस्त्यावर रात्री फक्त गाड्यांचाच उजेड दिसतो.रस्त्यावर सगळीकडे अंधार होत असल्यामुळे अपघात आणि लुटमारीची भीती वाढली आहे पण या रस्त्याचे काम अडकून पडल्यामुळे खांबावरचे दिवेसुद्धा चालू करता येत नसल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने वतीने नगर-मनमाड रस्त्याचे रुंदीकरण व डिव्हायडरचे काम पाच महिन्यांपूर्वी चालू केले होते.नवीन रस्ता डिव्हायडर तयार करण्यासाठी जुने डिव्हायडर तोडून रस्त्याच्या मधोमध त्यांनी खोदकाम केले होते.त्या दरम्यान पथदिव्यांच्या अंतर्गत तारा व दिव्यांचे खांब बऱ्याच ठिकाणी खराब झाले तर काही ठिकाणी खांब वाकले. त्यामुळे पत्रकार चौक ते पुढे सह्याद्री चौका पर्यंत अपवाद सोडला तर सगळेच पथदिवे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बंद पडलेले आहेत.सगळ्या रस्त्याचे पूर्ण काम झाल्यानंतर सगळे खांब आणि वायरिंग दुरुस्त केले जाईल तेव्ह सर्व पथदिवे सुरू होतील असे महापालिकेच्या विद्युत विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले ; पण ज्या ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण राहिले आहे त्या ठिकाणचे दिवे सुद्धा मनपाने दुरुस्त केलेले दिसत नाहीत.

रस्ताही रखडला,उजेडही गेला
सार्वजनिक बांधकाम विभागाने चालू केलेले नगर-मनमाड रस्त्याचे काम गेल्या चार ते पाच महिन्यांपासून अडकून पडले आहे.त्यामुळे काम अडकून पडल्यामुळे रस्त्याच्या कडेच्या गटारी, पथदिवे, इतर केबल, वाहतूक इत्यादी सुविधा विस्कळीत झाल्या आहेत.बांधकाम विभागाचे काम अडकून पडल्यामुळे पथदिवे सुरू करता येत नसल्याचे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे.पण या सगळ्याचा मात्र, सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.