सावळीविहीर गावाजवळ नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या दगडी खाणीत निघोज गावातील वैभव उर्फ सोनू धाकराव (वय २४) या तरुणाचा मृतदेह सोमवारी आढळून आला आहे. घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक रणजित गलांडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटवली.
शिर्डी अग्निशमन पथक आणि पोलिसांनी अथक प्रयत्न करून मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. मृत तरुणाच्या पश्चात त्याची पत्नी आणि दोन वर्षांचा मुलगा आहे. त्यामुळे या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे.

दोन वर्षांपूर्वी महिलेचा मृतदेहही आढळला होता
या खाणीत याआधीही एका महिलेचा मृतदेह सापडला होता. दोन वर्षे झाली तरी तिची ओळख पटलेली नाही. शवविच्छेदन अहवालानुसार तिचा गळा दाबून खून झाल्याचे निष्पन्न झाले होते, त्यामुळे अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या प्रकरणाचा तपास अद्यापही अपूर्ण आहे.
सुरक्षा व्यवस्थेचा अभाव, संरक्षण भिंतीची मागणी
या खाणीला कोणतीही संरक्षण भिंत नाही, त्यामुळे येथे वारंवार अशा घटना घडत आहेत. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे त्वरित संरक्षण भिंत उभारण्याची मागणी केली आहे. ही घटना नोंदवण्यासाठी शिर्डी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, संबंधित अधिकाऱ्यांनी यावर तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.