अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- राज्यातल्या बांधकाम मुजरांना मोफत ‘मध्यान्ह भोजन’ मागील दोन महिन्यांपासून ही योजना सुरू आहे. या योजनेत मोठा भ्रष्टाचार होत असून ती बंद करण्यात यावी, अशी मागणी समर्पण फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे.
या मागणीसाठी प्रजासत्ताकदिनी कामगार मंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर आंदोलन करण्याचा इशाराही समर्पण फाउंडेशनतर्फे देण्यात आला आहे.

महाविकास आघाडीच्या सरकारने सुरु केलेल्या शिवभोजन थाळी या योजनेनंतर आता बांधकाम कामगारांसाठीच्या ‘मध्यान्ह भोजन’ योजनेसंबंधीही तक्रारी सुरू झाल्या आहेत.
बांधकाम कामगारांसाठी ‘मध्यान्ह भोजन’ असलेल्या या योजनेत अभियंते, ठेकेदार, दुकानदार आणि रिक्षाचालकांनाही जेवण दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या योजनेत भ्रष्टाचार होत असल्याने बंद करण्याची मागणी समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले व अहमदनगर जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे बांधकाम कामगार प्रतिनिधी नंदू डहाणे यांनी केली आहे.
या योजनेऐवजी प्रत्येक कामगाराला रोज १२० रुपये किराणा व कोरडा शिधा घेण्यासाठी दिले जावेत, अशी मागणीही त्यांनी केली. या संदर्भात डॉ. घुले यांनी सांगितले की,
नगरच्या एमआयडीसीमध्ये ‘मध्यान्ह भोजन’ या योजनेचे स्वयंपाकगृह केले गेले असून, नगर शहर, शिर्डी व नेवासे तालुक्यातील कुकाणे येथेच हे जेवण पुरवले जाते.
जिल्ह्यात सध्या या योजनेतून रोज सुमारे दीड हजार कामगारांना जेवण दिले जाते. शिर्डी येथे या योजनेच्या अंमलबजावणीची पाहणी केली असता तेथे रिक्षाचालक, शिर्डी देवस्थानजवळ हार-फुले विकणारांना जेवण दिले जाते.
बांधकामांवरील गवंडी व बिगारी काम करणारांना हे जेवण देणे अपेक्षित असते. बांधकामावरील इंजिनिअर, लेबर ठेकेदार, सुपरवायझर हे मालक संकल्पनेत असल्याने त्यांना हे जेवण देणे अपेक्षित नाही.
तरीही त्यांनाही याचा लाभ दिला जातो, असा दावा घुले यांनी केला आहे. तसेच राज्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येकी २ कोटी रुपये खर्चून जिल्ह्याच्या ठिकाणी स्वयंपाकगृह व जिल्हाभरातील कामगारांना दुपारी व सायंकाळी जेवण पुरवण्यासाठी वितरण व्यवस्था केली गेली आहे.
राज्यभरात यासाठी सुमारे ४० ते ४२ कोटी रुपये खर्च केले आहेत. मागील दोन महिन्यात राज्यभरातील फक्त १ लाख ४६ हजार १३५ कामगारांना भोजन दिले गेले. नगर जिल्ह्यात २ लाखांवर कामगार बांधकाम क्षेत्रात आहेत व त्यातील ५० हजारांची नोंद झाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम