अहिल्यानगर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे, ज्याने सर्वांना हादरवून सोडले. बोल्हेगाव येथील उद्योजक दीपक परदेशी यांनी आपली थकीत रक्कम वसूल करण्यासाठी दोन व्यक्तींना कामावर ठेवले होते. मात्र, ही रक्कम वसूल होणे अशक्य असल्याचे लक्षात येताच त्या दोघांनी स्वतःच्या मालकाविरुद्धच कट रचला.
त्यांनी दीपक परदेशी यांच्याकडून १० कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा डाव आखला. परंतु हा प्रयत्न फसल्यावर त्यांनी परदेशी यांचा निर्घृण खून केला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे.

ह्याबाबत सविस्तर माहिती अशी कि, दीपक परदेशी हे नगर तालुक्यातील बोल्हेगाव येथील रहिवासी आणि उद्योजक होते. त्यांनी विळद गावातील काही लोकांना दिलेले पैसे परत मिळत नव्हते. ही रक्कम वसूल करण्यासाठी त्यांनी किरण बबन कोळपे (वय ३८, रा. विळद, ता. नगर) याला जबाबदारी सोपवली होती.
किरणने आपला साथीदार सागर गीताराम मोरे (वय २८, रा. ब्राह्मणी, ता. राहुरी) याला या कामात सहभागी करून घेतले. सागरने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, दीपक परदेशी यांनी त्यांना धमक्या देऊन किंवा गरज पडल्यास मारहाण करून का होईना पैसे वसूल करण्यास सांगितले होते.
पण विळदमधील लोकांकडून पैसे मिळवणे शक्य नसल्याचे लक्षात येताच या दोघांनी परदेशी यांच्याकडूनच मोठी रक्कम उकळण्याचा विचार केला. या प्रकरणाची सुरुवात २४ फेब्रुवारी २०२५ रोजी झाली, जेव्हा दीपक परदेशी बेपत्ता झाल्याची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात नोंदवली गेली.
पोलीस उपनिरीक्षक अमोल दत्तू गायधनी यांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे १७ मार्च २०२५ रोजी किरण कोळपे आणि सागर मोरे यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान त्यांनी खुनाची संपूर्ण हकीकत उघड केली. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून, पोलिस आता या गुन्ह्यातील इतर संभाव्य सहभागाचा शोध घेत आहेत.
२४ फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास किरण आणि सागर बोल्हेगावला पोहोचले. त्यांनी दीपक परदेशी यांना बोलण्याच्या बहाण्याने घराबाहेर बोलावले आणि किरणच्या पांढऱ्या इंडिका कारमध्ये बसवले. सागर आधीच मागच्या सीटवर बसलेला होता. तिघेही बोल्हेगावातून निंबळकच्या दिशेने निघाले. कार किरण चालवत होता, तर परदेशी त्याच्या शेजारी बसले होते.
वाटेत त्यांनी परदेशी यांच्याकडे १० कोटींची खंडणी मागितली. परदेशी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने किरणने सागरला त्यांचे हात पकडण्यास सांगितले. परदेशी सुटण्याचा प्रयत्न करत असताना सागरने नायलॉन दोरीने त्यांचा गळा आवळला. तरीही परदेशी यांनी झटापट करत कारचा दरवाजा उघडला आणि खाली पडले. शेवटी दोघांनी मिळून पुन्हा दोरीने गळा आवळून त्यांना ठार केले.
खून केल्यानंतर त्याच दिवशी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपींनी परदेशी यांचा मृतदेह निंबळक बायपास रस्त्यालगतच्या सिमेंटच्या बंद नालीत टाकला. सागरने मृतदेह अशा ठिकाणी ठेवला की तो सहजासहजी कोणाच्या नजरेस पडणार नाही. त्यानंतर दोघेही तिथून निघून गेले. पोलिसांनी तपासादरम्यान मृतदेह ताब्यात घेतला आणि या भयंकर कृत्याचा पर्दाफाश केला. या घटनेने उद्योजक आणि सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.