अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar Crime :- महिलेच्या नावे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करून बदनामी करणार्या अल्पवयीन मुलास येथील सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पारनेर तालुक्यातील एका महिलेची त्याने सोशल मीडियावर बदनामी केली असल्याची कबूली दिली आहे. महिलेने 3 फेब्रुवारी 2022 रोजी सायबर पोलिसांत फिर्याद दिली होती.
फिर्यादीच्या नावे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करून या अकाऊंटवरून फिर्यादीच्या मैत्रिणीला मेसेज करून फिर्यादीची बदनामी केली होती.
हा प्रकार 23 जानेवारी 2022 रोजीच्या पूर्वी घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतिक कोळी यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून आरोपीचे नाव निष्पन्न केले. अल्पवयीन आरोपी हा फिर्यादी यांच्या गावातील असल्याचे समोर आले आहे.
त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेला मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्याने बनावट अकाऊंट केल्याची कबूली दिली असल्याची माहिती निरीक्षक भोसले यांनी दिली.