शिर्डी नगरपंचायतीची नगरपालिका व्हावी यासाठी शिष्टमंडळ उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीस

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- शिर्डी नगरपंचायतीची नगरपालिका व्हावी म्हणून राज्य शासनाने त्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्वरित निर्णय घ्यावा म्हणुन शिर्डीतील सर्वपक्षीय शिष्टमंडळ काल गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व नगर विकासमंत्रीएकनाथ शिंदे यांना आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली भेटून शिर्डी नगरपालिका होण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.

शिर्डी नगरपंचायतीचे रूपांतर नगरपालिकेत करण्यासंदर्भातील उच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्या संदर्भातील अध्यादेश राज्य शासन लवकरच जारी करण्याच्या तयारीत असून आज दि 3 डिसेंबर रोजी शुक्रवारी सकाळी शिर्डी नगरपरिषद निर्मितीसाठीचा अध्यादेश मंत्रालय स्तरावरून निघण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे.

शिर्डी नगरपालिका येत्या दोन-तीन महिन्यांत स्थापन होणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. दरम्यान यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डी येथील पदाधिकारी निलेश कोते यांनी माध्यमांना बोलताना सांगितले की,

शिर्डी नगरपंचायतची निवडणूक घोषित झाल्यानंतर या निवडणुकीवर विविध पक्षीय नेते कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी बैठक घेऊन नगरपंचायत नको तर नगरपालिका व्हावी या मुद्द्यावरून निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

नगरपंचायत निवडणूक असली तरी या निवडणुकीवर बहिष्कार टाकून ही निवडणूक स्थगित करण्याचे शिर्डीकर यांचे प्रयत्न आहेत.

कारण नगरपंचायत निवडणूक झाली व नंतर काही महिन्यात शिर्डी नगरपालिका राज्य शासनाने घोषित केली तर मात्र परत निवडणूक होईल व सर्वांना परत निवडणूक लढवावी लागेल. म्हणून शिर्डीकरांनी बैठक घेऊन या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe