मेंढपाळतांड्यामध्ये वेठबिगार असलेल्या मुलाची सुटका; पारनेर तालुक्यातील घटना

Published on -

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील पळशी येथे एका मेंढपाळाकडे मेंढ्या चारण्यासाठी वेठबिगार म्हणून ठेवण्यात आलेल्या बारा वर्षे वयाच्या मुलाची चाइल्ड लाईन व सहायक कामगार आयुक्त यांनी सुटका केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील गौरी या मुलीच्या दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०२२ मध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. गौरीच्या मृत्यूनंतर आदिवासी भागात मेंढपाळतांड्यामध्ये अनेक लहान मुले वेठबिगार म्हणून राबवले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात राष्ट्रीय महामार्गालगत उभाडे या गावातआदिवासी कुटुंब राहतात येथील अनेक मुलांना काहीजण मेंढपाळाकडे मेंढ्या चारण्यासाठी वेठबिगार म्हणून घेऊन जातात. गौरी हिला वयाच्या ८ व्या वर्षापासून अवघ्या तीन हजार रुपयासाठी तिच्या वडिलांनी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका मेंढपाळाकडे मेंढ्या चारण्यासाठी सोपवण्यात आले होते. याच दरम्यान पारनेर तालुक्यातील पळशी-वनकुटे येथून देखील एक मुलाची सुटका केली होती.

दरम्यान आता परत एकदा पारनेर तालुक्यातील पळशी येथे एका मेंढपाळतांड्यामध्ये बारा वर्षे वयाच्या मुलाला वेठबिगारासारखे राबविले जात असल्याचे निदर्शनास आल्याने, तसेच हा मुलगा या कुटुंबाचा सदस्य नसून त्यास सालगड्यासारखे ठेवल्याचा संशय असल्याने या मुलास महिला व बालकल्याण विभागाने निरीक्षण गृहात हलविले आहे.

पारनेर तालुक्यातील पळशी येथील एक मेंढपाळ कुटुंब अहमदनगर शहर परिसरात मेंढ्या चारत आहे. या कुटुंबाच्या तांड्यावर एक बारा वर्षे वयाचा मुलगा नागरिकांना वेठबिगारासारखा काम करताना आढळून आला. याबाबत चाइल्ड लाईन व सहायक कामगार आयुक्त यांना कळविण्यात आले होते.

या दोन्ही विभागांनी शुक्रवार व शनिवारी या तांड्यावर जाऊन चौकशी केली असता हा मुलगा आमच्याच परिवारातील असल्याचे उत्तर संबंधित कुटुंबाने दिले. मात्र, महिला बालकल्याण विभागाने अधिक माहिती घेतली असता हा मुलगा या कुटुंबातील नसल्याचा संशय बळावला.

त्यामुळे त्यांनी या मुलाला ताब्यात घेऊन निरीक्षणगृहात ठेवले आहे. संबंधित मुलाची सर्व माहिती महिला बालकल्याण विभाग तपासत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe